दूध दराचा प्रश्न गुंतागुतीचा आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन निश्चित यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लेखी पत्र दिले.
त्यानंतर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेतल्याचे माकपचे नेते डॉ. अजित नवले, जनसंघर्ष संघटनेचे संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या हस्ते काल बुधवारी (दि.२९) लिंबू पाणी घेत उपोषण सोडले.
या संदर्भात हिवाळी अधिवेशनापूर्वी सदर बैठक झाली नाही. तर पुन्हा याच ठिकाणी तंबू ठोकून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. गेल्या सहा दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण काल बुधवारी स्थगित करण्यात आले.
मंगळवारी अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधून शासनाचा निषेध करण्यात आला होता. दरम्यान हे आंदोलन सुरू असताना अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला होता.
शासनाने या आंदोलनाची दखल घेत काल बुधवारी सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी विनंती केल्यावर अखेर लिंबू पाणी घेत हे उपोषण सोडण्यात आले.
यावेळी संदीप दराडे यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार बाळासाहेब थोरात, खा. सदाशिव लोखंडे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आ. वैभवराव पिचड, सर्व दूध उत्पादक शेतकरी, ग्रामपंचायत, विविध संघटना, संस्थांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
दूध पावडरची निर्यात करणे व अनुदान देणे हाच पर्याय :- आपण या उपोषणाचा नेता नाही. त्यांना पाठींबा देण्यासाठी सहभागी झालेलो आहे. उपोषण मागे घेण्याचा त्यांच्या निर्णयास माझी संमती आहे. मात्र ठरलेल्या बैठकीस जायचे किंवा नाही हे किसान सभेच्या नेत्याशी बोलून निर्णय घेतला जाईल.
दूध दर वाढीसाठी दूध पावडरची निर्यात करणे व शासनाने ५ रुपये लिटर मागे अनुदान देणे हाच पर्याय सर्व तज्ञांनी सांगितले आहे. त्यासाठी कोणत्याही बैठकीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण बैठकीतून काहीही साध्य होत नाही हा अनुभव आहे. – डॉ. अजित नवले. माकप नेते.