दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ येथे आगमन

 जळगाव, दि. १७ : दिल्लीहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली विशेष रेल्वे आज दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली.

या रेल्वेने राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे आगमन झाले. यापैकी १९ जिल्ह्यातील ३६९ विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले.

यावेळी या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या राज्यात आल्याचा आनंद व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्यात.

कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे गेलेले महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी दिल्ली येथे अडकले होते.

या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीहून विशेष रेल्वेने पाठविण्याचे निश्चित झाले होते.

त्यानुसार राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या रेल्वेचे आज दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. विद्यार्थ्याना घेऊन विशेष रेल्वे भुसवाळ स्थानकावर येणार असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्याना पुढे आपआपल्या जिल्ह्यात पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी जळगाव येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा नियंत्रक अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्यासह महसूल, रेल्वे, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना मार्गदर्शन केले.

दिल्लीहून या रेल्वेने राज्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकोला-२४, अमरावती-२०, वर्धा-१४, गडचिरोली-८, चंद्रपूर-१७, यवतमाळ-१७, धुळे-१४, नंदूरबार-९,

जळगाव-२९, औरंगाबाद-३१, जालना-१३, परभणी-२५, नागपूर-३३, भंडारा-११, गोंदिया-८, बुलढाणा-३०, वाशिम-१९, हिंगोली-१५, नांदेड-३२ याप्रमाणे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला.

त्यानंतर या विद्यार्थ्यांना जेवणाचे पॅकेट, केळी, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करुन देण्यात आल्यात. नंतर एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातील १६ बसेसमधून या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले.

तर उर्वरित विद्यार्थ्यांना घेऊन या विशेष रेल्वेने नाशिककडे प्रस्थान केले. या रेल्वेला नाशिक, कल्याण व पुणे येथे थांबा देण्यात येणार असून त्या-त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उतरविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment