शेतकऱयांनी जगायचं तरी कस ? शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट !

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेती उपयोगी साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पावसाळ्यात सुरुवातीला अत्यल्प पावसाच्या ओलीवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाचा खंड पडला, परिणामी उभे खरीप करपून गेले. सरासरी उत्पादन खर्चही मिळाला नाही.

त्या कालावधीत शेतीनिगडीत असणाऱ्या साहित्यांच्या चोरीच्या घटनामुळे शेतकरी वैतागले. तुषार सिंचन संचाचे साहित्य, कृषीपंप, केबल, स्टार्टर यासारख्या वस्तू चोरी गेल्यामुळे पिकांना पाणी देणे ठप्प झाले. शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिले, परंतु चोऱ्या थांबल्या नाहीत.

तिन आठवड्यातून एक आठवडा दिवसा शेतीचा विद्युत पुरवठा मिळतो. दोन आठवडे संध्याकाळ आणि रात्र, असा विज पुरवठा दिला जातो. बिबट्याच्या आणि रानडुकराच्या भितीने शेतकरी शेतात रात्री जात नाही. आणि त्याच संधीचा फायदा घेवून निर्डावलेले चोर सर्रास चोऱ्या करीत आहेत.

सध्या सुरु असलेल्या रब्बी हंगामातही चोऱ्यांचे सत्र सुरु असल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. अनेकजण पोलिसांपर्यंत जात नाही. गेली काही महिन्यापूर्वी सचिन शेळके यांचा कृषीपंप चोरी गेले.

गेल्या बुधवारी स्प्रिंकलर संचाचे बारा गण, विद्युत पंपाला पुरवठा करणारी केबल चोरी गेली. दुसरे दिवशी त्यांचे शेजारी असलेले चंद्रशेखर गिताराम ढोकचोळे यांच्या विहीरी जवळून केबल, नॉन रिटर्न व्हॉल्व तसेच अशोक महादेव अभंग यांच्याही केबल्सची चोरी झाली.

सदर बाब दुसऱ्या दिवशी लक्षात आल्यावर आसपास शोध घेत असतांना गावाकडे जाणाऱ्या प्रवरा कालव्याच्या रस्त्यालगत केबलचे वरील आवरण पडलेले दिसले. या संदर्भात टिळकनगर बीटचे पोलीस औताडे यांनी पाहणी केली.

याप्रकरणी शेतकरी सचिन अशोक शेळके (रा. खंडाळा) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून शेतीउपयोगी साहित्यांची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. कारखिले करित आहे.