Jayakwadi Dam : अवकाळी पाऊस ठरला फायद्याचा जायकवाडीला पाणी पोहोचताना …

Ahmednagarlive24 office
Published:

न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून, तसेच अहमदनगरमधील धरणांमधून अखेर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले.

धरणांमधून विसर्ग सुरू असतानाच रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरी ५० ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे जायकवाडीला पाणी पोहोचताना होणारा ३० टक्के अपव्यय अवघा १२ टक्क्यांवर आला आहे.

यामुळे १८ टक्के पाण्याची बचत झाली आहे. त्यात नाशिकच्या गंगापूर धरणातून १५० आणि दारणा धरणातून २५३ अशी एकूण ४०३ दलघफू पाण्याची बचत झाली आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी झाली.

त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र हे पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी थेट विरोध केला.

त्यामुळे मराठवाड्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयानेदेखील पाणी सोडण्यास स्थगिती दिली नाही.

त्यामुळे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले. मंगळवारपासून हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या ४३.६७ टक्के एवढा झाला आहे. तर गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास २० हजार ६०० क्यूसेकने आवक सुरू असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी गौतमी गोदावरी ) ०.५ टीएमसी आणि गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आले आहे.

त्यात गंगापूर व दारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४०३ दलघफू पाण्याची बचत अवकाळी पावसामुळे झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून १५० आणि दारणा धरणातून २५३ दलघफू पाणी कमी सोडावे लागले आहे. पावसामुळे वहनमार्गात येणारे अडथळे कमी होते. त्यामुळे या पाण्याची बचत होऊ शकली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe