Crop Insurance: अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे का? ‘या’ तीन पर्यायांनी द्या नुकसानीची पूर्वसूचना! तरच मिळेल भरपाई

Ajay Patil
Published:

Crop Insurance:- गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलेले असून अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्ष आणि काढणीला आलेला लाल कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व तसेच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातील इतर भागात दिसून येत असून बऱ्याच ठिकाणी कपाशी व तुरीचे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आता नुकसान झालेले शेतकरी विमा भरपाई करिता नुकसानीच्या पूर्वसूचना देत असून काही शेतकरी ऑनलाइन पद्धतीने पूर्व सूचना देत आहेत. परंतु यासाठी असलेल्या एप्लीकेशनमध्ये काही अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांसाठी झालेल्या नुकसानीच्या पूर्व सूचना देण्यासाठी ऑनलाइन प्रमाणेच काही ऑफलाइन पर्याय देखील उपलब्ध आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीखाली नुकसानीच्या पूर्वसूचना देणे गरजेचे असून नुकसानीचा योग्य तो पर्याय निवडण्याचे देखील आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

 क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनवर देता येतील पूर्वसूचना

यानुसार  नुकसानीची पूर्वसूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन वर शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्वसूचना देता येणार आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्याचे देखील समोर आलेले आहे. ओटीपी उशिरा येण्याची समस्या तसेच या अगोदर काही शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीखाली  पूर्वसूचना दिलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वसूचना देण्यामध्ये काही अडचणी येत आहेत.

यामध्ये पुन्हा नुकसानीच्या पूर्वसूचना देता येत नाहीत. परंतु झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने सध्या पिकांच्या नुकसान मोठ्या प्रमाणावर केले असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा त्यासंबंधीच्या पूर्वसूचना द्याव्या लागतील. परंतु या एप्लीकेशनमध्ये अडचण येत आहे. या एप्लीकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत

परंतु तरीदेखील ऑफलाइनपेक्षा पूर्वसूचना देण्याकरिता शेतकऱ्यांनी या एप्लीकेशनलाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण या एप्लीकेशनच्या माध्यमातून जर पूर्वसूचना दिल्या तर त्यांची नोंद थेट केंद्राच्या पोर्टलवर होत असते व त्यामुळे विमा नाकारला जाण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर वेळ न दवडता लवकरात लवकर ऑनलाइन तक्रार करणे गरजेचे आहे.

 ऑफलाइन तक्रार करण्याची पद्धत

सध्या काही कारणांमुळे नुकसान होऊन जास्त वेळ झाला व तक्रार देता आली नाही तर असे शेतकरी ऑफलाइन तक्रार देऊ शकतात. याकरिता शेतकरी ई-मेलचा आधार घेऊ शकतात किंवा ज्या जिल्ह्यासाठी जी पिक विमा कंपनी आहे त्या कंपनीच्या टोल फ्री क्रमांक वर देखील नुकसानीची तक्रार करू शकतात.

याशिवाय संबंधित पिक विमा कंपनीचे तालुका किंवा जिल्हा स्तरावर कार्यालय असेल त्या ठिकाणी देखील ही तक्रार देता येणार आहे. आपली तक्रार देताना शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे राहिल व कागदपत्रांमुळे तक्रार नाकारली जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

 ऑफलाइन तक्रार देताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

शेतकरी बंधूंनी जर पिक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन तक्रार दिली असेल तर त्या तक्रारीची पोचपावती घेणे गरजेचे असून घेतलेल्या पोचपावतीवर त्या विमा कंपनीचे प्रतिनिधीचे सही आणि शिक्का आहे की नाही हे बघणे देखील गरजेचे आहे.

कारण मागील काही अनुभवावरून दिसून आले आहे की अनेकदा विमा कंपनी अर्ज गहाळ झाले किंवा सापडत नाहीत अशा प्रकारची कारणे देत असतात. त्यामुळे पोचपावती सही शिक्कासह घेणे गरजेचे आहे.जेणेकरून आपल्याकडे पुरावा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 नुकसान भरपाईचा प्रकार कसा ठरतो?

शेतात पिकं उभी होती व त्या पिकांचे नुकसान झाले तर अशा पिकांसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही बाब लागू पडते. तसेच दुसरे म्हणजे पिकाची काढणी झालेली आहे परंतु पिके शेतातच पडून होती व या पावसामुळे नुकसान झाले तर ही परिस्थिती काढणी पश्चात नुकसान या बाबीत येते.

यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत संबंधित विमा उतरवलेले क्षेत्र जलमय झाले, भूस्खलन किंवा गारपीट तसेच ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग इत्यादी आपत्तींचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर गारपीट आणि क्षेत्र जलमय झाल्यास आपल्याला भरपाई मिळणे शक्य आहे.

क्षेत्र जलमय होणे या जोखीमअंतर्गत जर पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली व विहीर ओसंडून वाहू लागली किंवा पुराचे पाणी शेतामध्ये शिरून नुकसान झाले व शेतामध्ये जास्त कालावधीपर्यंत पाणी तुंबून राहिले या परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले असे दिसून येत असेल तर नुकसानीची हे बाब लागू होते.

त्यामुळे पिकाची परिस्थिती कशा पद्धतीची होती किंवा कोणते पीक कोणत्या अवस्थेत होते व कोणत्या नुकसानीच्या बाबी अंतर्गत पूर्वसूचना द्यायची हे ठरवूनच पूर्व सूचना द्यावी. तसे पाहायला गेले तर शेतकरी बंधूंनी विमा कंपनी आणि कृषी विभागाशी बोलूनच पूर्वसूचना देणे गरजेचे आहे व हेच फायदेशीर ठरेल. त्यामुळे कुठल्या बाबीअंतर्गत पूर्वसूचना द्यावी याबाबतीत व्यवस्थित सल्लामसलत किंवा मार्गदर्शन घेऊनच  पूर्वसूचना देणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe