कोलकाता कोरोनाने संपूर्ण जगावर संकट ओढवलं आहे. आता आरोग्य विभाग कोरोनाशी झगडत आहे. पश्चिम बंगालमध्ये आता नवीनच संकट उभा राहील आहे. अनेक खासगी रुग्णालयांमधून 300 पेक्षा जास्त नर्सनी नोकरी सोडली आहे.
त्यामुळे आरोग्य विभागावरच संकट ओढावलं आहे. आई वडिलांचा दबाव आणि सुरक्षेची चिंता हे नोकरी सोडण्याचे कारण असल्याचे काही नर्सने सांगितले आहे.
कोलकात्यातील 17 खासगी आरोग्य संस्थांची द असोसिएशन ठफ हॉस्पिटल्स ऑफ इस्टर्न इंडियांने मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये हे संकट दूर करण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.
खासगी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं की, या आठवड्याच्या सुरुवातीला कमीत कमी 185 नर्स मणिपूरला निघून गेल्या. त्यानंतर शनिवारी एकूण 169 नर्स मणिपूर, त्रिपूरा, ओडिसा आणि झारखंडला गेल्याची माहिती मिळत आहे.
मणिपूरला परतलेल्या एका नर्सने सांगितलं की, सुरक्षेची चिंता आणि त्यांच्यावर आई वडिलांकडून नोकरी सोडण्यासाठी दबाव येत होता. नोकरी सोडण्यामागे हेच कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे आणखी 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 160 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 2576 रुग्ण आढळले आहेत.