7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन आयोग, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि महागाई सवलत इत्यादी मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. त्यापैकी जर आपण महागाई भत्त्याचा विचार केला तर नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला असून त्यानुसार तो आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका झालेला आहे.
तसेच महागाई भत्त्यातील ही वाढ साधारणपणे एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. परंतु जर आपण येणाऱ्या नवीन वर्षाचा विचार केला तर या वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार महागाई सवलत आणि महागाई भत्ता यामध्ये आणखीन वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. याबद्दलचीच महत्वाची माहिती या लेखात घेऊ.

केंद्र सरकार नवीन वर्षात महागाई सवलत आणि महागाई भत्त्यात करेल वाढ?
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठी भेट मिळण्याची शक्यता असून या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकार देशातील 48 लाख पेक्षा जास्त असलेले केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारक यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवून देते. या अनुषंगाने जानेवारी ते जून 2024 या महिन्याच्या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ करण्याची गरज असून त्या अनुषंगाने 2024 मध्ये महागाई भत्यामध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याच्या ऐवजी अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्याची शक्यता आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. कारण पुढच्या वर्षी एप्रिल ते मे या दरम्यान देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
महागाई भत्त्यात होऊ शकते चार टक्क्यांची वाढ
केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्त्यातील वाढ करून एक आनंदाची बातमी देऊ शकते. कारण केंद्र सरकार प्रत्येक वर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वर्षातून महागाई भत्त्यात वाढ करते. एआयसीपीआय डेटा पाहिला तर सरकार सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते. आता या नवीन वर्षात महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून जर असे झाले तर महागाई भत्ता 50% होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महागाई सवलत देखील वाढेल
एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता सोबतच महागाई सवलत देखील वाढवली जाण्याची शक्यता आहे. जर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व महागाई सवलत यामध्ये वाढ झाली तर त्याचा थेट सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि पेन्शन धारकांच्या पेन्शनवर होत असतो.
सध्याची स्थिती पाहिली तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून 46% महागाई भत्ता आणि महागाई सवलत दिली जात आहे. जर नवीन वर्षामध्ये यात चार टक्क्यांची वाढ केली तर महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये चार टक्क्यांची वाढ होऊन ते 50 टक्क्यांपर्यंत होऊ शकते.
किमान वेतन किती वाढेल?
जर सरकारच्या माध्यमातून कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या महागाई भत्ता व सवलत यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली तर महागाई भत्ता आणि सवलत 50 टक्क्यांपर्यंत वाढेल व त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगार आणि पेन्शन धारकांची पेन्शन यामध्ये देखील वाढ होईल. जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा विचार केला तर यामध्ये 9,000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा काय होईल?
साधारणपणे असे म्हटले जाते की महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा तो मूळ वेतनामध्ये एकत्र होतो व त्यानंतर तो शून्य होतो आणि नव्याने त्याची गणना केली जाते. पण सातव्या वेतन आयोगांतर्गत पाहिले तर 50 टक्के महागाई भत्ता असल्यास मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.
सहाव्या वेतन आयोगाने देखील अशा प्रकारची कोणतीही शिफारस केलेली नाही. फक्त यामध्ये पन्नास टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर सरकार आठवा आयोग स्थापन करू शकते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.