‘लसीकरणामुळे लाळखुरकत आजारावर नियंत्रण

Published on -

लसीकरणामुळे जनावरे ‘लाळखुरकत सारख्या आजाराला बळी पडणार नाहीत, त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा कराळे यांनी केले आहे.

नगर तालुक्‍यातील ग्रामीण भागात जनावरांमध्ये ‘लाळखुरकत आजाराचे प्रमाण वाढु नये, यासाठी जेऊर पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. कराळे यांनी हे आवाहन केले आहे.

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना जेऊर श्रेणी ९ कार्यक्षेत्रातील १२ गावातील गाई व म्हैस वर्गीय जनावरांना दि.२२ नोव्हेंबर पासून लाळखुरकत आजाराचे प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

तसेच सर्वच जनावरांना पशु आधार योजनेचे बिल्ले लावण्याचे व जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच गाई व म्हैस वर्ग जनावरांचे सर्वेक्षण करून गाभण न राहणाऱ्या जनावरांचे शिबीर घेऊन उपचार करण्यात येणार आहेत.

सर्व पशुपालकांनी पुढील ३०-४५ दिवसांमध्ये सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून आपली जनावरे लसीकरणा पासून वंचित राहणार नाही. ही लसीकरण मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

लाळखुरकत हा विषाणू जन्य आजार असून, तो खुरे असणाऱ्या प्राण्यांचा आजार आहे. हा आजार आजारी जनावरांच्या लाळेमार्फत निरोगी जनावरांध्ये पसरतो . आजार पसरण्याचा कारणांमध्ये आजारी जनावरांची वाहतूक, तसेच चारा, पाणी, शेतकऱ्यांनी आजारी गोठ्यावर जाणे, यामुळे आजार पसरण्याचा धोका वाढतो.

एकदा लसीकरण केल्यावर साधारण सहा महिने प्रतिकार शक्‍ती तयार होते . त्यामुळे पशुपालकांनी लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दूर ठेवून जनावरांचे लसीकरण करून घ्यावे . : डॉ. प्रज्ञा कराळे, पशुवैद्यकीय अधिकारी, जेऊर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe