सर्व-समन्वयाने-नाशिक-जिल

Ahmednagarlive24
Published:

वर्धा, दि. 18  : एकाच दिवशी 3  कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून घरी रहा कोरोना  योद्धा व्हा हे  विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.

यामध्ये  जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच खासदार,  आमदारांसोबतच  इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा गृह विलगीकरणातील कुटुंबांच्या घरी भेट देऊन घरी रहा कोरोना योद्धा व्हा, असे आवाहन केले.

इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर  गृह विलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर न  पडण्याच्या या जनजागृती अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कोरोना बाधित जिल्हयातून आलेल्या नागरिकांमुळे या आजाराचा प्रसार जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना  14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

त्यांनी दिलेल्या  पर्यायानुसार त्यांच्या  सोईकरिता  संस्थात्मक विलगीकरण  न करता संपूर्ण परिवारासहित गृहविलगीकरण करण्यात येत आहे.

कोरोना बाधित  जिल्ह्यातून मागील 7 दिवसात  सुमारे 7 हजार नागरिकानी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या संख्येत रोज भर पडत आहे.

बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या  संपूर्ण कुटुंबाला गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.  घराबाहेर पडू नये असे बजावले असतानाही लोक बाहेर वावरत असल्याचे लक्षात आल्यावर ‘घरी राहा, कोरोना योद्धा व्हा’  असे जनजागृती अभियान राबविण्याचे ठरले.

आज 18 मे रोजी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या नेतृत्वात  एकाच दिवशी 7 हजार 312  कुटुंबांच्या घरी भेट देण्यास सुरुवात झाली.

या अभियानात  खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली,

मुख्य कार्यकारी अधिकारी सचीन  ओंबासे, नगर परिषद अध्यक्ष यांनीही सहभागी होत या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करून लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले.

घरी भेट देताना नागरिकांना घरी राहा, कोरोना योद्धा व्हा, असे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. या पत्रात गृह विलगीकरणातील व्यक्तींनी घरातच राहून स्वतःचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासोबतच सामाजिक सुरक्षितता जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाच्या युद्धात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याप्रमाणेच आपल्या घरी राहण्याचे कर्तव्यसुद्धा कोरोना योद्ध्यांसारखेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईतील आपणही एक सैनिक व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज या अभियानात नगर परिषद अध्यक्ष  अतुल तराळे,  प्रेम बसंतानी, प्रशांत सव्वालाखे, तीनही उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,

सर्व  तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद सभापती व सदस्य पंचायत समिती सभापती व सदस्य, रोटरी सदस्य, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, तसेच ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment