Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांड राज्यभर गाजले. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेसह अनेक आरोपी अटकेत आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी काल (दि.७ डिसेंबर) जिल्हा न्यायालयात सुरू झाली.
यावेळी रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांनी घटनेचा थरार सांगितला. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी आज (शुक्रवारी) वायकर यांची उलट तपासणी होईल.
न्यायालयात सिंधूबाई वायकर यांनी सांगितले की, माझे गुडघे दुखत असल्याने मुलगी रेखा जरे मला डॉक्टरकडे पुण्याला घेऊन गेली होती. आमच्या समवेत विजय माला माने व कुणाल जरे हे देखील आलेले होते.
परत येत असताना शिरूर बायपासजवळ एका टेम्पोने कट मारला होता. त्यानंतर पुढे आल्यानंतर जातेगाव घाटात दुचाकीवरील दोघांनी आमच्या कारला कट मारला होता. त्यानंतर या दोघांनी रेखाशी वाद घातला आणि चाकूने वार करत हत्या करून टाकली.
यावेळी कुणालने रुग्णवाहिका थांबवण्याचा प्रयत्न केला. सुपा टोल नाक्यावरील लोकांनी आम्हाला मदत केली असल्याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला.
३० नोव्हेंबर २०२० रोजी रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. यातील काही आरोपी ताब्यात घेतले होते. परंतु यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे काही दिवस फरार होता. त्याला काही दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी आता बाळ बोठे याच्यासह १२ जण आरोपी आहेत. या १२ पैकी सहाजण प्रत्यक्ष खुनाच्या घटनेत तर उर्वरित सहा बाळ बोठेला फरार असतानाच्या काळात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान काल रेखा जरे यांच्या आई व घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांची साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी त्यांची सरतपासणी घेतली. यावेळी त्यांनी वरील घटनाक्रम वर्तवला.