Onion News : यंदा पावसाचा लहरीपणा व वातावरणातील विषमता ही शेतीला चांगलीच मारक ठरली. सुरवातीला ओढ दिल्याने खरीप पिके वाया गेली. त्यातनंतर हिमतीने पेरलेली पिके अवकाळीने हिरावून घेतली.
त्यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला. यात त्याला कांद्यामधून आशेचा किरण दिसला. कांदा ४० रुपये किलो पेक्षा जास्त गेला. शेतकरी कांदा काढणीची लगबग करू लागला. जुना कांदा मार्केटमध्ये येऊ लागला.
असे असताना शासनाने निर्यातबंदी केली. अन भाव गडगडले. त्यामुळे शेतकरी पुन्हा कोलमडला. अनेकांचा काढलेला लाल कांदा अद्यापही वाफ्यातच आहे. तो मार्केटला आणावा की थोडे थांबावे या संभ्रमात शेतकरी आहे.
कांद्याच्या भावात दीड ते दोन हजारांची घसरण
आता कांद्याच्या दरात सुमारे दीड ते दोन हजारांची घसरण झाली आहे. सध्या कांदा अडीच ते तीन हजार रूपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. हाच बाजार साडेचार हजारांपर्यंत गेला होता. मागील वर्षी कमी भाव होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता.
नुकताच चांगला भाव मिळण्यास सुरूवातही झाल्याने माल बाहेर काढला. दहा दिवसांपूर्वी राहुरी, पारनेर, संगमनेर बाजार समितीत कांदा हा साडेचार हजारांपर्यंत गेला होता. लाला कांदाही त्याच दराने विकला गेला होता.
परंतु हे भाव अचानक कोसळले. रविवारी (१० डिसेंबर) विविध मार्केटमध्ये हे भाव ३ हजारांपर्यंत गेले होते.
शेतकरी संतप्त
कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. अनेक मार्केटमध्ये लिलाव बंद पाडण्यापर्यंत शेतकरी सरसावले होते. संगमेनर मध्ये शेतकऱ्यांनी रास्तारोको देखील केला होता.