रत्नाकर मतकरींच्या निधनाने महाराष्ट्राने बहुआयामी ‘रत्न’ गमावले! : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. 18 : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक बहुआयामी ‘रत्न’ गमावले आहे.

त्यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारही होते. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन केले.

‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, अशा अनेक नाटकांमधून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली.

‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित ‘आरण्यक’ ही नाटके रंगभूमीवर गाजली.

वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ या एकांकिकेपासून लेखनास सुरुवात केली ती शेवटपर्यंत अव्याहतपणे सुरुच होती. मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन मतकरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment