Ahmednagar News : शासनातर्फे शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेंतर्गतच शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीकविमा सरकारने जाहीर केला. अवघ्या रुपयात विमा कवच मिळत असल्याने लाखो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला.
खरीप हंगामातील पिकांसाठी विमा कवच घेतल्यानंतर आता रबी पिकांसाठी विमा कवच शेतकरी घेत आहे.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी घेतला विमा?
रबी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ६ डिसेंबरपर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यात एकूण विम्यासाठी चार लाख ३५ हजार अर्ज आले आहेत. रब्बी पेरणीचे जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार ९६१.८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
यामध्ये आतापर्यंत २ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विम्याची सर्व रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. परंतु शासनाने आता यान खरीप हंगामापासून शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम भरण्याचा
निर्णय घेतला असल्याने केवळ एक रुपयांत शेतकऱ्यांना विमा कवच मिळत आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा दुप्पट झालीये.
आणखी किती दिवस चालणार एक रुपयांत विमा योजना ?
महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून राबवली जात आहे. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून सर्वसमावेशक पीक विमा योजना पुढील तीन वर्षासाठी राज्यात राबविण्याचा निर्णय आता घेतला गेला आहे. त्यामुळे तीन वर्ष सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
रब्बी पिकांचा विमा भरण्याची मुदत किती तारखेपर्यंत?
रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीतील पिकाला संरक्षण देणाऱ्या पिकाचा विमा उतरविण्याची वेळ संपली आहे. हरभरा, गहू पिकासाठी विमा उतरविण्यासाठी दि.१५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.