Agricultural News : शेतकऱ्यांना शेती करताना धान्यापाठोपाठ महत्वाचा असणारा घटक म्हणजे खते. खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते. बऱ्याचदा ही खते काळ्या बाजारात देखील विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.
परंतु आता शेतकऱ्यांची ही फरफट थांबणार आहे. पंतप्रधान किसान समृद्धी योजनेंतर्गत आता गावातील सोसायट्यांमध्येच खत विक्री केली जाणार आहे. या योजनेंतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांना १५१ उद्योग करण्याची परवानगी शासनाकडून दिली जाणार असून
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९४६ विकास सोसायट्यांना परवानगी देण्यात आली आहे. या परवानगी मिळालेल्या सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना गावातच रासायनिक खते व कीटकनाशके उपलब्ध होतील.
सोसायट्यांना मिळणार उत्पन्नाचे स्रोत
गावातील सोसायट्यांना उत्पन्नाचे स्रोत कमी असतात. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असलेल्या १ हजार ९५ विकास सोसायट्या कार्यरत आहेत. या सोसायट्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत तसेच शेतकऱ्यांना खते उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान समृद्धी योजना आणली आहे. सहकार विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार असू पहिल्या टप्प्यात १ हजार ३९५ विकास सोसायट्या पैकी ९४६ विकास सोसायट्यांना कृषी साहित्य सेवा केंद्राची परवानगी दिली जाणार आहे. गावातील विकास सोसायटींचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून परवानग्याबाबतची कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
सद्यस्थितीला किती सोसायट्यांत सुरु आहे खत विक्री ?
जिल्ह्यातील ५४ सोसायट्यांव्दारे सध्या रासायनिक खत विक्री केली जात आहे. पंतप्रधान किसान समृद्धी योजनेंतर्गत याचे विक्री परवाना वितरित करण्यात येणार आहे.
सोसायट्यांना परवाना घेणे गरजेचे
गावातील पात्र ठरलेल्या विकास सोसायटीला खत विक्रीसाठी कृषी विभागाकडून परवाना घ्यावा लागणार आहे. या परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर सोसायट्यांना परवाने दिली जातील.
सोसायट्यांना खतांसह ‘हे’ व्यवसाय देखील करता येतील
सोसायट्यांना विविध व्यवसाय या योजनेंतर्गत करता येतील. यामध्ये रासायनिक खते, बी- बियाणे विक्री, कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रीन स्टोअरेज, पेट्रोलपंप आदी व्यवसाय सुरु करता येतील. यातून उत्पन्न वाढीसाठी सोर्स निर्माण करणे हा शासनाचा उद्देश आहे.