मुंबई, दि.१८ : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे.
टाळेबंदीमुळे सध्या देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. रोजगाराच्या निमित्ताने देशातल्या शहरी भागांमध्ये स्थिरावलेल्या स्थलांतरित मजुरांपुढे त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येकाला आपल्या राज्याची, गावाची ओढ लागली आहे. मालाडहून आपापल्या गावी निघालेल्या स्थलांतरित मजुरांना निरोप देण्यासाठी
मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख स्वत: मालाड माईंडस्पेस येथील बँक रोडवर उपस्थित राहिले व दोन हजार कुटुंबांना जेवण व पाण्याचे वाटप केले.
प्रवाशांनी घाई करु नये. ज्यांची नावं गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या यादीमध्ये आलेली नाहीत, त्यांनी आपापल्या घरी जावं लवकरच त्यांना देखील गावी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असंही श्री. शेख यांनी सांगितलं.