मुंबई दि.18 : शहरांमधून गावाकडे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात मागणीनुसार काम उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने त्यांची नोंदणी करणे,
त्यांना रोजगार पत्रक उपलब्ध करून देणे व त्यांना मागणीनुसार काम देणे यासाठी नियोजन करण्याची सूचना राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केंद्र सरकारला सुचविले होते,
या मागणीला यश आले असून केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर अतिरिक्त 40 हजार कोटींची तरतूद केली आहे.
कोरोना सारख्या वैश्विक महामारी च्या अनुषंगाने केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेन्द्र तोमर यांनी दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी देशातील सर्व रोजगार हमी व ग्राम विकास मंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केंद्र शासनास असे निदर्शनास आणून दिले होते की, देशात प्रथमच शहराकडून ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित होणार आहे.
ही बाब लक्षात घेता या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात मागणीनुसार काम उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने त्यांची नोंदणी करणे ,
त्यांना रोजगार पत्रक उपलब्ध करून देणे व त्यांना मागणीनुसार काम देणे याचे देखील नियोजन राज्याने केल्याचे नमूद केले होते.
श्री. भुमरे यांनी मांडलेल्या विविध सूचनांची नोंद केंद्र पातळीवर घेण्यात आली आहे ,आणि म्हणूनच देशपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अतिरिक्त मागणी लक्षात घेता, चाळीस हजार कोटींची अतिरिक्त तरतूद केंद्र सरकारने केली आहे .
श्री.भुमरे यांनी शहरामधील अकुशल मजूर गावाकडे गेल्यानंतर कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे रोजंदारी न मिळाल्याने त्रस्त झालेला असेल त्याला रोजगाराची आवश्यकता असेल असेही सुचविले होते.
त्यामुळे त्याला स्थानिक पातळीवरच अकुशल रोजगार उपलब्ध व्हावा व त्याचे जीवन सुसह्य व्हावे यासारख्या दूरगामी विचाराची दखल केंद्र शासनाने घेतली आहे.