महाराष्ट्राला निसर्गाने खूप भरभरून दिलेले असून तुम्ही जर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. यामध्ये भाषा, लोक संस्कृती, लोक परंपरा, चालरीती इत्यादी बाबतीत विविधता दिसतेच परंतु नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिले तर मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक विविधता व भौगोलिक विविधता देखील दिसून येते.
या विविधतेचा कळत नकळत परिणाम हा त्या त्या परिसरात राहणाऱ्या समाज जीवनावर होत असतो. जर आपण महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगांचा विचार केला तर हा परिसर निसर्ग सौंदर्याने खूपच नटलेला असून अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळ या परिसरातच आहेत.

मोठमोठी गडकिल्ले असो किंवा निसर्गाने मुक्तहस्ताने उथळण केलेले निसर्ग सौंदर्य असो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. याच सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा विचार केला तर या डोंगररांगांमध्ये असे एक छोटेसे गाव आहे की ते गाव त्याच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात असलेल्या या गावात सूर्योदय होतो तो दोन ते अडीच तास उशिराने आणि सूर्य मावळतो तो दोन ते अडीच तास लवकर. म्हणजेच एकंदरीत दिवस पाहिला तर या गावात सहा ते सात तासांचा असतो. या अनोखे गाव अहमदनगर जिल्ह्यात असून या गावाचे नाव आहे फोफसंडी हे होय.
फोफसंडी हे नाव कसे पडले?
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात वसलेले हे छोटसं गाव असून भारतामध्ये जेव्हा इंग्रजांची राजवट होती तेव्हा त्या कालावधीमध्ये फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी होता व ज्या दिवशी त्याला सुट्टी असायची तेव्हा तो विश्रांती करिता या गावांमध्ये येत असे.
तेव्हापासून या गावाला किंवा या ठिकाणाला फॉफसंडे हे नाव पडले. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश झाला व त्यातून आता या गावाला फोफसंडी असे म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या हजार ते बाराशे च्या दरम्यान असून या ठिकाणी बारा आडनावाचे लोक राहतात.
या आडनावामध्ये प्रामुख्याने पिचड, गोरे, उंबरे, कोंडार, भद्रिके, मेमाणे इत्यादी आडनावांची लोक इथे राहतात. या गावाचा प्रमुख व्यवसाय शेती आहे परंतु पावसाच्या चार महिन्यांमध्ये या ठिकाणी शेती करता येते व आठ महिन्यांकरिता रोजंदारीकरिता पुणे किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणचे लोक जातात.
या गावांमध्ये प्रामुख्याने भात तसेच वरई, नागली यासारखी पिके घेतली जातात. हे गाव निसर्गाने समृद्ध असून या ठिकाणी अजून पर्यंत रस्ता किंवा पाण्यासारख्या प्रमुख गोष्टींची वाणवा आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी शेतीला पाणी नसल्यामुळे इतर कालावधीत पीक घेता येत नाहीत.
प्रसिद्ध असलेल्या मांडवी नदीचा उगम या गावाच्या हद्दीतूनच होतो व म्हटले जाते की या ठिकाणच्या गुहेमध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी असे पडले आहे. पावसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धबधबे प्रवाहित होतात. यामध्ये फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे.