एकेकाळी नगर जिल्ह्यात सुजलाम, सुफलामतेसह शांततेचा प्रतिक समजला जाणारा राहुरी तालुका गुन्हेगाराचा केंद्र बनत चालला आहे. शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, बिगो जुगार अड्डे यांसह अवैध वाळू तस्करीने थैमान घातले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारीचा कळस राहुरीतच गाठला जात आहे. सर्व सामान्यांवर दडपशाही करीत वाळू तस्करांची दहशत वाढविण्यात पोलिसांचे पाठबळ आहे. प्रत्येक गावामध्ये गुन्हेगारांच्या खांद्यावर हात ठेवत खाकी वर्दीधारक फिरत असल्याने सर्वसामान्यांमध्ये गुंडाची दशहत वाढण्याचे प्रकार वाढत आहे.
पोलिस ठाण्यातही गुन्हेगारांच्या टोळक्या बसूनच असतात. वाळू तस्करांचे पोलिस प्रशासनाशी असलेले लागेबंध लपून राहिलेले नाही. ग्रामिण व शहर हद्दीतून राजरोसपणे दुचाकी चोऱ्या होतच आहेत.
राहुरी पोलिसांना दुचाकी चोरट्यांपैकी एकालाही पकडण्यात यश आलेले नाही. दुचाकी चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरबाजारपेठेतून दुचाकी चोरून नेत आहेत.
तालुक्यात हाणामाऱ्या, महिलांची, तरूणीची छेडछाड तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेण्याचे प्रकारही राजरोसपणे घडले आहे. राहुरीत पोलिस प्रशासनाची नाचक्की थांबविण्यासाठी सक्षम अधिकारी लाभेल का? अशी विचारणा होऊ लागली आहे.
राहुरीत पोलिसांची भूमिका पाहता गुन्हेगारांची दहशत वाढतच चालली आहे. राहुरी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दूध भेसळ करणारांची संख्या वाढली असून वर्षभरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तीन ते चार ठिकाणी छापा टाकला;
मात्र याबाबत कुठेही योग्य प्रकारे तपास झाला नाही, त्यामुळे दूध भेसळखोरांची मुजोरी चांगलीच वाढली असून शिलेगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला; मात्र अधिकाऱ्यांनी नसती उठाठेव नको म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तांदुळवाडी परिसरात ८ ते ९ महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईवेळी लिकिड पॅराफीनसारखे घातक रसायन जप्त करण्यात आले होते. यावर कोणतीही कारवाई झाली नाही. याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुचाकी चोरी प्रकरणानंतर चारचाकी चोऱ्यातही वाढ झाली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या पीकांसह विद्युत पंप, केबल चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत, अवैध धंदे उजळ माथ्याने सुरूच आहेत. राहुरीच्या कायदा व सुव्यवस्थेला खिंडार पडले असून गेल्या काही वर्षांत ११ पोलीस अधिकारी बदलून आले; मात्र पोलीस यंत्रणा सुरळीत होताना दिसत नाही.
तालुक्याला अधिकारी टिकत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडथळे निर्माण होतात, अशी चर्चा होत आहे. राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खासगी सावकारीचा व्यवसाय सुरु आहे. अनेक शेतकरी व तरुण तसेच दुग्ध व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार या बेकायदा सावकारांच्या जाचात अडकल्याचे चित्र आहे. यावरदेखील कारवाई केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.