Ahmednagar News : परवानगी नाकारल्यानंतरही येथील साई तपोभूमी मंदिरानजिकच्या महात्मा गांधी प्रदर्शन मंचावर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाला. त्यामुळे ‘धार्मिक व पवित्र ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आता लावणीने होत असून हे फक्त कोपरगावातच घडू शकते’, अशी टीका भाजपाचे शहर सरचिटणीस जयेश बडवे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.
पत्रकात बडवे यांनी म्हटले, की सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्ताचे कारण देत कोपरगाव शहर पोलिसांनी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती; मात्र शहरातील खासगी आयोजकांनी नियोजनाप्रमाणे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घडवून आणला.

पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी संयोजकांनी कार्यक्रमाची सर्व तयारी केली होती. आमदार आशुतोष काळे गटाच्या ताब्यात असलेल्या महात्मा गांधी प्रदर्शन मंचावर गुरूवारी हा कार्यक्रम झाला.
शेजारीच सद्गुरू साईबाबांची पवित्र तपोभूमी हे धार्मिक आणि अध्यात्मिक प्रेरणेचे ठिकाण आहे. गुरुवार हा बाबांचा वार असतो, या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक साईबाबांच्या दर्शनासाठी साई तपोभूमी येथे येतात.
कार्यक्रमाच्या वेळी मंदिरात भजन सुरू होते. शेजारी गौतमी पाटील यांचे नृत्य सुरू होते. हे धक्कादायक आहे. सांस्कृतिक कार्यक्रम कोणते असावेत, कुठे व कोणत्या ठिकाणी असावेत, याचं भान बाळगणं महत्त्वाचं असल्याचा टोलाही बडवे यांनी लगावला आहे.
पत्रकात पुढे म्हटले, की खासगी आयोजकांकडून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले; मात्र त्यांच्या अनेक कार्यक्रमांत हुल्लडबाजी व गोंधळ झाला. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
तरीही कार्यक्रम झाला; परंतु कोपरगावच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी तो राजकारणाचा मुद्दा ठरलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिलं जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.