प्रेम प्रकरणातून जन्माला आलेल्या मुलीस साईमंदिरात सोडून गेलेली माता सापडली

Published on -

शिर्डी :- साईमंदिर परिसरात ३१ मे रोजी सहा महिन्यांच्या चिमुकलीस सोडून देणारी माता अखेर सापडली आहे.

प्रेमप्रकरणातून या मुलीस जन्म दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील कडुली गावातील ही माता आहे. 

३१ मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास साईमंदिरालगत असलेल्या गुरुस्थानजवळ सहा महिन्यांची मुलगी रडताना भाविकांना दिसली होती.

सुरक्षा विभागाने या मुलीस संस्थानच्या कार्यालयात आणून वैद्यकीय तपासणी केली. या मुलीस सोडणारी तिची माता पलायन करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली हाेती. 

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून या महिलेचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.

पोलिसांनी या मुलीची अहमनगरच्या बालकल्याण समितीत रवानगी केली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पाेलिस व साई संस्थान प्रशासन या मातेचा शोध घेत होते.

अखेर दोन दिवसांनी ही महिला पुन्हा साईदरबारी हजर झाली. प्रेमप्रकरणातून या मुलीस जन्म दिल्याची कबुली महिलेने दिली. 

पती दारू पिऊन त्रास देत असल्याने मामांकडे राहत होते. तेथे एकाशी प्रेमसंबंध जुळून त्यातून मुलगी जन्माला आली.

मात्र, या मुलीस प्रियकरासह पतीने सांभाळण्यास नकार दिल्याने मुलीस साईदरबारी आणून सोडून दिल्याचे तिने सांगितले.

मायेच्या ओढीने ही माता पुन्हा साईदरबारी आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी शिर्डी पोलिस करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News