पुणे : पोलीस प्रशासन सध्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन कोरोनाग्रस्तांचे संरक्षण करत आहेत. या खाकीचा आणखीन एक कौतुकास्पद मुद्दा समोर आला आहे.
पोलिसांनी गरजूंना आतापर्यंत जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळून १५ लाख १७ हजार ७८८ पाकिटांचे वाटप केले आहे. ‘सोशल पोलिसिंग सेल’ या कक्षाच्या माध्यमातून हे जेवण पुरविले जाते.

आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून या कक्षाची स्थापना झाली. ‘सोशल पोलिसिंग सेल’कडून विशेष क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एखाद्याला समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर त्यांनी ‘सोशल पोलिसिंग सेल’च्या क्रमांकावर ( मोबाइल क्र-८८०६८०६३०८) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी शहरातील बेघर, परप्रांतीय कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला, रुग्णांचे नातेवाईक तसेच शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नियमित जेवणाची पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत.
आतापर्यंत १५ लाख १७ हजार ७८८ जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. शहरात पूर्वाचलमधील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. टाळेबंदीमुळे या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते.
त्यांनाही जीवनावश्यक वस्तू तसेच जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. ससून रुग्णालय तसेच कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.













