अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक २२ मे पासून जिल्ह्यातील विविध व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.अर्थात, जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्ये प्रतिबंधीत केलेल्या व्यवहार/कृती/क्रिया (Activities) व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दि.१३ मार्च २०२० पासुन लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोना (कोव्हीड 19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याकारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा कालावधी हा दि.३१ मे २०२० रोजीचे मध्यरात्री पर्यंत वाढविला असुन लॉकडाऊन संदर्भांत सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामुळे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी लॉकडाऊन संदर्भांत सुधारीत मार्गदर्शक सुचनांसह प्रतिबंधात्मक आदेश दि.31 मे रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू करणे आवश्यक आहे.
त्यानुसार, अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास या आदेशान्वये दि.२२ मे, २०२० रोजी पासुन ते दि.३१ मे,२०२० रोजीचे मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई करीत आहे.
यामध्ये, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. वैद्यकिय सेवा, एअर अम्बुलन्स व सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्या हवाई प्रवासी वाहतुक व्यतिरिक्त सर्व प्रकारची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. मेट्रो रेल सेवा, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था/ प्रशिक्षण संस्था/ कोचींग क्लासेस इत्यादी बंद राहतील (तथापी ऑनलाईन /दुरस्थः शिकवणी यास परवानगी राहील.)
आरोग्य / पोलीस/शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी, अडकलेले व्यक्ती, पर्यटक यांच्या तात्पुरत्या निवासासाठी व विलगीकरण सुविधेसाठी आरक्षित केलेले हॉटेल्स, रेस्टारंट व आदरातिथ्य सेवा वगळून इतर सर्व हॉटेल्स, रेस्टारंट व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. तथापी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथील कॅन्टीन सुरु ठेवता येतील. केवळ घरपोच डिलीवरीसाठी रेस्टारंटचे किचन सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
सिनेमा हॉल्स, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्यादीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर/ फिरण्यावर संध्याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध राहील. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्यावश्यक
सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील.
अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन मध्ये करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता वरील प्रमाणे नॉन रेड झोन मध्ये प्रतिबंधीत केलेल्या व्यवहार/कृती/क्रिया व्यतिरिक्त परवानगी असलेल्या सर्व व्यवहार/कृती/क्रियासाठी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परवानगी दिलेल्या व्यवहार/कृती/क्रिया यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. क्रीडासंकूले, स्टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्यायामासाठी खुले ठेवण्याची परवानगी असेल. तथापी प्रेक्षक वा सामूहिक जमावाला परवानगी असणार नाही. शारिरीक व्यायाम व इतर व्यवहार/कृती/क्रिया (Activities) साठी सामाजिक अंतराच्या (Social Distancing) निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी असेल.1) दुचाकी – ०१ स्वार, 2) तीन चाकी – १+२
3) चार चाकी – १+२
जिल्हांतर्गत बस सेवेस जास्तीत-जास्त ५० टक्के क्षमतेसह व शारिरीक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
सर्व बाजारपेठा /दुकाने सकाळी ०९ ते सायं.०५ या कालावधीत खुली राहतील. तथापी बाजारपेठा / दुकानांचे ठिकाणी गर्दी आढळल्यास व सामाजिक अंतराचे पालन न झाल्यास स्थानिक प्रशासन त्वरीत अशा बाजारपेठा/ दुकाने बंद करण्याची कार्यवाही करतील.
अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये असल्याने सार्वजनिक ठिकाणी व कामाचे ठिकाणी कोव्हीड19 चे व्यवस्थापनाचे दृष्टीने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणा-यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे. विवाह समारंभात सामाजिक अंतराचे पालन करुन जास्तीत-जास्त ५० व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
अंत्यविधीस सामाजिक अंतराचे पालन करुन जास्तीत-जास्त ५० व्यक्तींस उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. दुकानांचे ठिकाणी ग्राहकांमध्ये कमीत कमी ०६ फुट अंतर असेल व ०५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणांसाठी खालील अतिरिक्त मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. यामध्ये, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमध्ये कर्मचारी व ग्राहक यांची गर्दी होणार नाही यास्तव कामांच्या व व्यवसायांच्या वेळांचे नियोजन करावे.
कामाचे ठिकाणी आत येण्याचे व बाहेर जाण्याचे मार्ग तसेच सामाईक मोकळ्या जागांचे ठिकाणी थर्मल स्कॅनर, हॅण्ड वॉश व सॅनिटायझर्स पुरविण्यात यावे. कामाचे ठिकाणी, सुविधा केंद्राचे ठिकाणी सर्वसामान्यपणे वेळोवेळी हाताळण्यात येणारे भाग/वस्तू (उदा.दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट स्वीच, विजेची बटणे इ.) यांचे वेळोवेळी / शिफ्टचे दरम्यान निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कामांचे ठिकाणांचे सर्व प्रभारी यांनी त्याठिकाणी कामगार / कर्मचारी यांचेमध्ये योग्य अंतरासह तसेच शिफ्ट दरम्यान व जेवणाची वेळ या दरम्यान योग्य अंतर ठेवुन सामाजिक अंतराचे पालन करावे.
कोणतीही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com