Ahmednagar Politics News : राज्यात सध्या लोकसभा आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
अहमदनगर मध्ये देखील सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशातच आता अहमदनगर मधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात एक मोठी घडामोड झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्षांची उचल बांगडी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदावर महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांची वर्णी लागली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र संपत बारस्कर यांना दिले आहे.
पण आधीच्या जिल्हाध्यक्षांची रातोरात उचल बांगडी झाली असल्याने सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात याबाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नेमका काय बिनसल आहे याविषयी आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
आधीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आणि अजित पवार गटातील नेत्यांमध्ये काही अंतर्गत कलह सुरू आहे का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान संपत बारस्करांना नियुक्तीपत्र देताना अजित पवार गटातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
यात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार शेखर निकम, आमदार नितीन पवार, आमदार किरण सरनाईक यांचा समावेश होता. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याला युवा चेहरा लाभावा यासाठी ही नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याची कबुली दिली आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी बारस्कर यांचा नगरसेवक पदाचा अनुभव जिल्याला उपयोगी पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, या नियुक्तीवर आधीच्या जिल्हाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी मी सात वर्षे हे पद प्रामाणिकपणे सांभाळले असून आता युवकांना संधी देण्याची पक्षाची भूमिका असून मी स्वगृहीच आहे,
असे नमूद केले आहे. या उचल बांगडीमुळे चर्चा सुरू होण्यापूर्वीच विधाते यांच्या वक्तव्यामुळे या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.