Ahmednagar News : नियतीचा खेळ कधी कुणाला कळला असे म्हटले जाते. सर्व काही सुरळीत असताना अचानक असे काही घडून जाते की माणूसही हतबल होऊन जातो. पुन्हा हीच नियती सर्वकाही जुळवून आणून देते.
अशा घटना समाजातही घडतात. अहमदनगर जिल्ह्यात याचा पुन्हा प्रत्यय आला. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवासी व्यक्ती आपल्या मुलीला पुणे येथे सोडविण्यास गेला, पण येताना अचानक गायब झाला. गावी परतण्याऐवजी तो पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेला असतो.
१५ वर्षे तेथील सरकारी निवारा केंद्रात आश्रय त्याला मिळतो पण अचानक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने १५ वर्षानंतर घरी येतो…अशी फिल्मी स्टाईल घटना राहुरीत घडलीये. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अशोक खेले असे या व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : अशोक खेले हे २००९ मध्ये मूलगी सोनाली हिला पुणे येथे सोडवायला गेले. पुण्यातून ते दौंड येथील नातेवाईकाकडे ते मुक्कामासही गेले. तेथून हावड़ा एक्स्प्रेसने निघाले तर थेट कोलकाताला जाऊन पोहोचले.
ते घरी न आल्याने घरच्यांनी अनेक ठिकाणी खूप शोध घेतला. आज, उद्या मानूस परत येईल या आशेने अनेक दिवस कुटुंब डोळे लावून बसले. असे करता करता १५ वर्षे सरली.
तिकडे रस्त्यावर फिरत असलेल्या अशोक यांना तेथील पोलिसांनी सरकारच्या निवारा केंद्रामध्ये नेले. त्यांना आपले मूळ गाव, तालुका आणि राज्याची कोणतीही माहिती निवारा केंद्रातील लोकांना अथवा पोलिसांना देता येत नव्हती. मानसिक धक्का बसल्याने अशोक यांचा स्मृतिभ्रंश झाला होता.
त्यानंतर ते कोलकाता येथील ईश्वर संकल्प या संस्थेच्या संपर्कात ते गेल्याने तेथे संस्थेचे समन्वयक तपन प्रधान यांनी त्यांच्यावर उपचार केले. तेथे थोडी थोडी सुधारणा त्यांत झाली. १५ वर्षांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्रातील असल्याचे तपन यांना सांगितले. परंतु अधिक माहिती त्यांना देता आली नाही.
श्रीरामपूर येथील मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीकृष्ण बडाख हे काही वर्षापासून ईश्वर संकल्प संस्थेच्या संपर्कात होते. प्रधान यांनी बडाख व वडाळा महादेवचे माजी सरपंच सचिन पवार यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांना अशोक हे वांबोरी येथील असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांना तेथे पोहोच करण्यात आले. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने अशोक यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. अंगणात सडा रांगोळी करून अशोक यांचे स्वागत करण्यात आले. कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता.