कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

Ahmednagarlive24
Published:

ठाणे दि. 20 – ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व मनपा क्षेत्रात व ग्रामीण भागात  लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी,

कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे  यांनी दिले.

ठाणे  जिल्हाधिकारी  कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला  जिल्हा परिषद अध्यक्ष  दिपाली पाटील,   मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस सहआयुक्त सुरेश कुमार मेकला,

कल्याण मनपा आयुक्त विजय सुर्यवंशी, जिपमुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड यांसह  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला.

यावेळी बोलताना श्री.शिंदे  म्हणाले, ठाणे जिल्ह्यात  वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.

त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. जिल्ह्याकडे विविध विभागांकडे तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग आरोग्य यंत्रणा उभारणी करण्यासाठी करण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. केंद्रीय पथकाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यात आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.

आपल्याकडे कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रण करण्याबरोबरच भविष्यात रुग्ण वाढल्यास आपले नियोजन परिपूर्ण असावे यादृष्टीने सर्व व्यवस्था करावी. कोरोना  चाचण्या, उपचार यांना प्राधान्य देण्यात यावे. रुग्णालयांची क्षमता वाढविण्याबरोबरच अद्ययावतीकरणावर भर देण्यात यावा.

मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने काटेकोरपणे   नियोजन करावे अशा सूचनाही श्री शिंदे यांनी संबंधितांना दिल्या. सर्व मनपांनी कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोविड योद्ध्यांची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आरोग्य यंत्रणेने प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन  श्री. शिंदे यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  माहिती दिली. तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment