जळगाव (जिमाका) दि. 20 – कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 33 जण काल सायंकाळी (19 मे) आपापल्या घरी परतले.
या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे.
याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत.
याकरिता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर, 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे.
याचठिकाणी रुग्णांचे स्क्रिनिंग, दाखल करुन घेणे, उपचार करणे, स्वॅब घेणे आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन करण्यात येत आहे.
रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 29 टक्के म्हणजेच 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 318 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 105 रुग्ण अमळनेर तालुक्यातील आहे. तर त्या खालोखाल जळगाव शहर 67, भुसावळ शहर 62 रुग्ण आहे.
असे असले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्येही सर्वाधिक 78 रुग्ण अमळनेरचे, भुसावळचे 9, जळगावचे 8, पाचोरा येथील 13 तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.
येथील महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील,
डॉ. गायकवाड व त्यांची टीम तर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अहोरात्र मेहनत घेत असून त्यांना लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, महानगरपालिकेचे आयुक्त सुतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे व आरोग्य विभागाचे डॉक्टर,
परिचारिका व कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून एकाच दिवशी जिल्ह्यातील 33 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली सात दिवस होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.