मुंबई, दि.२०:- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेन द्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली, असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
२२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊन ने अडकून पडले होते.
त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ३२५ ट्रेनने कामगार, मजूरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.
तर आज दि.२० मे रोजी दिवसभरात आणखी ६५ विशेष श्रमिक ट्रेन जाणार आहेत. अशा जवळपास ३९० विशेष ट्रेन द्वारे ५ लाख २० हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.
तिकीट खर्च राज्य शासनामार्फत
परप्रांतीय कामगार बंधू-भगिनींना विनंती करण्यात येत आहे की, त्यांचे नाव यादीत असेल आणि त्यांना फोन आला असेल तरच त्यांनी संबंधित ट्रेनसाठी रेल्वे स्टेशनला यावे. रेल्वे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये.
त्यांच्या तिकीटाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे त्यांना तिकीट काढण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी असेही आवाहन श्री देशमुख यांनी केले आहे.
मुंबई शहरामध्ये विशेषतः परप्रांतीय मजूर, कामगार यांची संख्या जास्त आहे. त्या सर्वांची नोंद पोलिसांना घ्यावी लागत आहे. तसेच जाणाऱ्या कामगारांना व्यवस्थित पाठवण्याची जबाबदारी आहे.
त्यामुळे मुंबई पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील अनुभवी जवळपास पंधराशे अधिकारी व कर्मचारी आजपासून देण्यात आलेले आहे.
३९० विशेष श्रमिक ट्रेन
राज्याच्या विविध भागातून १ मे पासून २० मे पर्यंत राज्यातील विविध स्टेशन वरून ३९० विशेष श्रमिक ट्रेन द्वारे या सर्वांना पाठविण्यात आले.
यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (२०७), राजस्थान(१५), बिहार(५१), कर्नाटक(९), मध्यप्रदेश(३४), जम्मू(३) ,ओरिसा(११), पश्चिम बंगाल (३) झारखंड(१८), यासह इतर राज्यांचा समावेश आहे.
भिवंडी ७, डहाणू १,कल्याण २, पनवेल २१, ठाणे ९, लोकमान्य टिळक टर्मिनस ४५ ,सीएसटी ५१,वसई रोड ९, पालघर ४, बोरिवली २५,बांद्रा टर्मिनस २२ ,अमरावती ४,अहमदनगर ६,मिरज ५,
सातारा ७,पुणे ३२, कोल्हापूर १७, नाशिक रोड ५, नंदुरबार ४, भुसावळ ३ , साईनगर शिर्डी ४, जालना २, नागपूर ९,औरंगाबाद ९ , रत्नागिरी ३ यासह इतर रेल्वे स्टेशन वरून उपरोक्त श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.