Ahmednagar News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णता गरम पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेते देखील उमेदवारीच्या तिकिटासाठी पक्षाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
अशातच अहमदनगर मध्ये महायुतीचा पहिला-वहिला मेळावा पार पडला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच या मेळाव्याचे आयोजन झाले होते. हा मेळावा राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.

मेळावा महायुतीचा असला तरीदेखील याचे आयोजकं महसूल मंत्री विखे पाटीलच होते हे वेगळं सांगायला नको. पण निवडणुकीच्या आधीच घेण्यात आलेला या महायुतीचा मेळाव्यात नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला. कारण की महायुतीच्या या पहिल्या मेळाव्याला व्यासपीठांवरील खुर्च्यांसाठी रेटारेटी झाली होती.
महायुतीच्या नेत्यांची व्यासपीठावर झालेली गर्दी आणि खुर्च्यांची कमी संख्या यामुळे मेळाव्याचे नियोजन कोलमडले होते. खुर्च्यांची कमी संख्या असल्याने आणि योग्य नियोजन नसल्याने जी खुर्ची रिकामी व्हायची तिच्यावर नेते स्थानापन्न व्हायचे. दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांनी या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. या मेळाव्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे दोरीतील भाषण वगळले तर इतर नेत्यांना फारशी संधी मिळाली नाही. इतर नेत्यांना फक्त कोपरखळी मारण्यातच धन्यता मानावी लागली.
महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला हा मेळावा 12 वाजेपर्यंत फारच सुना होता. मात्र 12 नंतर खऱ्या अर्थाने मेळाव्याला गर्दी होण्यास सुरुवात झाली. आमदार राम शिंदे बाराला मेळाव्यासाठी पोहोचले, त्यानंतर विखे पाटलांची हजेरी लागली. मग खऱ्या अर्थाने महायुतीचा हा पहिला मेळावा सजला.
या मेळाव्याला मात्र महायुती मधील काही आमदारांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना देखील उधाण आले आहे. दरम्यान मेळाव्याच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत महायुतीचे राज्यातील वरिष्ठ नेते पाहायला मिळाले.
खासदार सुजय विखे मात्र व्यासपीठावर दुसऱ्या रांगेत बसलेले होते. तेथूनच ते या मेळाव्याचे नियोजन करत होते. यामुळे त्यांना बसायला खुर्ची असली तरी देखील बसण्याचे भाग्य त्यांच्याकडे नव्हते, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
कारण की डॉक्टर विखेंना नियोजनासाठी वारंवार खुर्चीवरून उठून उभे राहणे भाग होते. या मेळाव्यात समाविष्ट झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या समर्थनार्थ मात्र मोठ्या-मोठ्या घोषणा होत होत्या. यामुळे हा मेळावा महायुतीचा आहे असे वाटत होते. पण महायुतीतील वेगवेगळ्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षांच्या समर्थनार्थ देखील या ठिकाणी घोषणाबाजी केली.
आमदार संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मेळावा सुरू झाल्यानंतर मेळाव्यात इंट्री घेतली. त्यांची इंट्री मात्र सॉलिड पावरफूल ठरली. आपल्या कार्यकर्त्यांसह मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झालेल्या जगतापांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. हा जल्लोष महसूल मंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबवला. पण प्रहार संघटना कुठे मागे राहणार होती त्यांनी देखील आपल्या संघटनेच्या नावाने आणि नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
यानंतर प्रहार संघटना आणि संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी एक संघ घोषणा सुरू केल्या. घोषणा एकसंघ होती मात्र घोषणा वेगवेगळ्या पक्षांसाठी होती. यावेळी अजित पवार यांच्या समर्थनार्थ देखील मोठ्या घोषणा झाल्यात. व्यासपीठाबाबत बोलायचं झालं तर दोनच नेत्यांची भाषणे व्यासपीठावर चांगली दोरीची होती. ती दोन्ही नेते भाजपाचीच होती. महसूल मंत्री विखे पाटील आणि माजी मंत्री विधानपरिषद आमदार राम शिंदे यांची भाषणे दोरीतली ठरली.
दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांचे भाषण सुरू असताना महसूल मंत्री आणि आमदार शिंदे यांच्यात मोठी रंगतदार चर्चा पाहायला मिळाली. भाजपासाठी हे या मेळाव्याचे एक फलित आपण म्हणू शकतो. दरम्यान, सुजय विखे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उठबस केल्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमासाठी तेथून काढता पाय घेतला. अशा तऱ्हेने महायुतीचा हा पहिला मेळावा संपन्न झाला.
ह्या पण बातम्या वाचा
- यंदाचे वर्ष गद्दारांना निवडणूकीत संपविण्याचे ! शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं
- अहमदनगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना घरचा आहेर ! स्वपक्षीय पिता-पुत्रांच्या कार्यपद्धतीवर नाराज, निवडणुक जड जाणार
- हुकुमशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ नाही लागत …! आमदार राम शिंदे यांची आ. रोहीत पवार यांच्यावर टीका