सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या गावातील व्यक्तीसाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते त्यासाठी खर्च करण्यात येणार निधी ग्रामपंचायतींनी ग्राम निधीमधून करावा,
ग्रामपंचयतींना हा निधी खर्च करताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून तसे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
कणकवली तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.
यावेळी, तहसिलदार रमेश पवार, गट विकास अधिकारी एम.आर.भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवती बॅकेचे चेअरमन सतिश सावंत, सहायक पोलीस निरिक्षक सागर खंडागळे, संजय पडते, संदेश पारकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी व कणकवली तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अहोरात्र काम करीत, त्याच्या बरोबरीने ग्रामस्तरावर आशा वर्कर्स, पार्ट टाईम मदतनीस, आंगणवाडी सेविका कार्यरत आहे.
त्यांचे योगदान मोठे आहे. पण त्याना मिळणारे मानधन कमी आहे ते कोरोनाच्या काळापुरते प्रत्येकांना प्रतिमहिना 500 रुपये वाढवून देण्यात येईल त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल.
असे सांगून पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, चिरे वाहतूक करण्याऱ्या गाड्याची वाहतूक व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात यावे तसेच सदर वाहनांची डिलिव्हरी कोठे व कशा प्रकारे होते यावर लक्ष ठेवण्यात यावे.
तलाठी, ग्रामसेवक यांनी त्यांना ज्या गावात पदभार दिला आहे त्या गावात वास्तव्यास असावे असे आदेश तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी द्यावेत.
तलाठी यांनी त्यांचा जॉबचार्ट रोज सादर करावा, तसेच किमान दोन गावांना त्यांनी रोज भेट द्यावी, रात्री अपरात्री गावात येणाऱ्या लोकांना यापुढे ग्राम समितीने ठराव करुन गावातील प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा तसे प्रशासनाला कळविण्यात यावे, ग्राम समितीने ठरविलेल्या कालावधीत गावात प्रवेश द्यावा.
प्रवेश वेळेनंतर जे प्रवासी येतील त्यांची सोय तालुकास्तरावरील तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी करावी. असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सोशल मीडियावर सरपंचांची बदनामी करण्याऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
तसेच विना पास, फक्त टोकन घेऊन कोणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्यास जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, काही लोक दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा कंटेन्मेंट झोन बाहेरील पत्ता देऊन पास काढत आहेत व जिल्ह्यात येत आहेत.
यावर नियंत्रण येण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना पास सोबतच पासधारकाचे आधार कार्डही तपासण्यात येणार आहे. तसेच पास एकाच्या नावे व त्याच पासवर इतर व्यक्ती येत आहेत. असा प्रकारही होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येत आहे.