Maratha Andolan : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन पुकारले होते. मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जावे या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले होते.
या आंदोलनात करोडो मराठ्यांनी सहभाग घेतलेला होता. खरे तर हे आंदोलन 26 जानेवारीला अर्थातच काल मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचणार होते. मात्र, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला अवधी दिला आणि काल हे आंदोलन नवी मुंबईमध्ये मुक्कामी राहिले.

राज्य सरकारला 27 जानेवारी 12 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी वेळ देण्यात आला. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या काल रात्री उशिरा पूर्ण करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आज पहाटे या सर्व मागण्यांबाबतचे अध्यादेश देखील निर्गमित झालेले आहेत.
यामुळे खऱ्या अर्थाने मराठ्यांचा विजय झाला असल्याच्या भावना आता जनसामान्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या असल्याने जरांगे पाटील आता नवी मुंबईतील वाशी येथे विजयी सभा घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजर राहणार अशी माहिती समोर आलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारने सर्व मागण्या मान्य झाल्यात अशी माहिती समाज बांधवांना दिली. तसेच याबाबतचे सर्व अध्यादेश निर्गमित झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आता कुणबी नोंदी सापडलेल्या सर्व मराठा बांधवांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि सगे-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. अध्यादेशात कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सग्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल असे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती तयार केली जाणार आहे. तसेच मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार असे त्यांनी म्हटले आहे.
शिवाय विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. शिंदे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्याने आता हे आंदोलन मुंबईत जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.