Tomato Variety:- पिकांच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढे पीक व्यवस्थापनाला महत्त्व आहे तेवढेच महत्व आहे त्या पिकाच्या दर्जेदार आणि जातिवंत व्हरायटींच्या निवडीला आहे. कारण जर कुठल्याही पिकाची व्हरायटी म्हणजेच वाण जर चांगले असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस पद्धतीचे मिळते.
हेच तत्व फळबागापासून तर भाजीपाला पिकांपर्यंत लागू आहे. त्यामध्ये जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वांगी, मिरची आणि टोमॅटो या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. टोमॅटोची लागवड भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील टोमॅटो हा खूप फायद्याचा असल्यामुळे टोमॅटोला मागणी देखील चांगली असते. म्हणूनच टोमॅटोला सुपरफुड असे देखील म्हटले जाते. जर आपण टोमॅटोच्या जातींचा विचार केला तर यामध्ये भारतामध्ये पिकणाऱ्या अर्का रक्षक टोमॅटोला विदेशात देखील मोठी मागणी आहे.
अर्का रक्षक टोमॅटो लागवडीतून एका एकरामध्ये पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. याच अर्का रक्षक टोमॅटोची माहिती आपण या लेखात घेऊ.
अर्का रक्षक टोमॅटोला विदेशात देखील आहे मागणी
अर्का रक्षक हा टोमॅटोचा वाण इंडियन हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट,बेंगलोरने विकसित केला असून या वाणाला विदेशात देखील मोठी मागणी आहे. साधारणपणे या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे जर शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रात याची लागवड केली तर पाच लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळू शकतो.
भारता व्यतिरिक्त या टोमॅटो वाणाला घाणा, मलेशिया तसेच पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये खूप मागणी आहे. जर आपण अर्का रक्षक या टोमॅटो वाणाची उत्पादन क्षमता पाहिली तर प्रतिरोप 18 किलो इतकी आहे. या टोमॅटोची लोकप्रियता आणि मागणी पाहता या टोमॅटोच्या उत्पादनात वाढ व्हावी याकरिता नॅशनल सीड कॉर्पोरेशनकडून मोठ्या प्रमाणावर बियाणे तयार केले जात आहे.
सध्या जर आपण भारताचा विचार केला तर सध्या टोमॅटोला सरासरी 32 रुपये किलो पर्यंत दर मिळताना दिसून येत आहे. दिल्लीमध्ये साधारणपणे 40 रुपयाच्या आसपास टोमॅटोला सध्या दर मिळताना दिसून येत आहेत.
साधारणपणे टोमॅटोच्या दरात उन्हाळ्याच्या कालावधीत दर वाढ होते अशी स्थिती आपल्याला दिसून येते. पुढे त्या दृष्टिकोनातून जर अर्का रक्षक टोमॅटो वाणाची लागवड केली तर शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते.