जुनी माणसे म्हणतात पौष महिन्यात लग्न कार्य करू नये. हा पूर्वापार चालत आलेला समज आहे. परंतु आता अलीकडील काळात या विचार धारणेतही फरक झाला आहे. आता पौष महिन्यातही लग्नकार्य उरकले जात आहेत.
काही पंचांगकर्ते म्हणतात, हा महिना अत्यंत शुभ असल्याने लग्न कार्य करण्यास हरकत नाही. आधुनिक जमान्यात या पौष महिन्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला असून पौषातही अहमदनगर जिल्ह्यात धूमधडाक्यात लग्नकार्य होत आहेत.
पौष महिना शुभ की अशुभ? :- पौष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यांत महत्त्वाचे कुठलेही काम किवा लग्नकार्य करण्यास काहीच हरकत नसल्याचे पंचागतज्ज्ञांचे म्हणणे आहे. १२ जानेवारी ते दि. ९ फेब्रुवारी या कालावधीत पौष महिना असून या कालावधीत सध्या लग्नकार्य धुमधडाक्यात सुरू आहेत.
पौष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात महत्त्वाचे कुठलेही काम किंवा लग्नकार्य करण्यास काहीच हरकत नाही. दाते पंचांगात विवाह करण्यास हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध पंचागतज्ज्ञांनी पौष महिन्यात विवाह करण्यास हरकत नसल्याचे मत नोंदवले आहे.
पौषात ३ ते ४ मुहूर्त :- पौष महिन्यात सहसा लग्नकार्य करत नाहीत. असा प्रघात पूर्वापार चालत आलेला आहे. परंतु यंदा पौष महिन्यात ३ ते ४ मुहूर्त निघालेले होते. इतरही काही पंचांगानुसार मुहूर्त काढत असतात. परंतु इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात लग्नाचे खूपच कमी प्रमाण होते. जे मुहूर्त होते त्या दिवशी अनेकांनी लग्नसोहळे उरकल्याने एकाच दिवशी अनेक विवाह पार पडले.