Rajya Sabha Elections 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार

Ahmednagarlive24 office
Published:
Rajya Sabha Elections 2024

Rajya Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, शिवसेनेचे (ठाकरे) अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या सहा जागांचाही यात समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे.

आयोगाने दिले ल्या माहितीनुसार, राज्यसभेचे ५० सदस्य येत्या २ एप्रिल रोजी, तर सहा सदस्य ३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. ज्या राज्यांमधील खासदार निवृत्त होणार आहेत त्यात महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थानचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशात राज्यसभेच्या तीन, बिहारमध्ये सहा, छत्तीसगडमध्ये एक, गुजरातमध्ये चार, हरयाणामध्ये एक, हिमाचल प्रदेशमध्ये एक, कर्नाटकमध्ये चार, मध्य प्रदेशमध्ये पाच जागा आहेत.

महाराष्ट्रातील सहा, तेलंगणमधील तीन, उत्तर प्रदेशातील दहा, उत्तराखंडमधील एक, पश्चिम बंगालमधील पाच, ओडिशातील तीन आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवरही निवडणूक होणार आहे.

हे सदस्य होणार निवृत्त

या वर्षी ज्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे त्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आदींची नावे आहेत.

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळही याच वर्षी संपत आहे. जे.पी. नड्डा हे त्यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत. आता जे. पी. नड्डा यांना हिमाचल प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यातून निवडणूक लढवावी लागेल, कारण तेथे भाजप आकडेवारीत काँग्रेसपेक्षा मागे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe