Ahmednagar News : जीवघेण्या उसवाहतुकीचा हट्ट प्रवाशांच्या जीवाशी करतोय खेळ

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने अनेक महिने ऊसतोड सुरु असते. परंतु ही ऊसतोड सुरु असताना जी उसवाहतूक केली जाते ती मोठी समस्या सध्या नगरवासीयांसाठी बनली आहे. उसवाहतुकीसाठी अनेक नियम आहेत.

वजनाचेही लिमिट आहे. परंतु उसवाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव चित्र आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे ही ऊस वाहतूक प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत आहे.

ट्रॅक्टर रिकामा असो अथवा उसाने भरलेला, रस्ता अरुंद असला तरी रस्त्यावरुन बाजूला व्हायचेच नाही, मागून अथवा समोरुन येणाऱ्या वाहनाने हवे तर थांबावे किंवा बाजूपट्टीवरून जावे, असा प्रकार बहुतेक ट्रॅक्टर चालकांकडून होतो. अनेक कारणांनी उसाने भरलेले आणि रिकामे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोठेही थांबलेले दिसतात.

या अशा जीवघेण्या वाहतुकीने अनेकांचे बळी देखील घेतले असल्याचे वास्तव आहे. ट्रॅक्टरने उसवाहतूक करत असताना, अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. रस्ता किती रुंदीचा, इतरांनी वाहतूक कशी करावी हा देखील विचार हे लोक करताना दिसत नाहीत.

अनेकदा ट्रॅक्टर थांबविण्यासाठी किंवा उभे असताना ते जागचे हलू नयेत यासाठी चाकांखाली मोठे दगड लावून ठेवतात परंतु ते दगड नंतर पुन्हा रस्त्यातून हटवले जात नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी इतर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडल्या जातात,

त्यामुळे पाठीमागून आलेल्या वाहनचालकांना पुढे जाताना काळजी घ्यावी लागते तसेच ट्रॅक्टरला चालवताना चालक स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे लावतात, त्यामुळे इतर प्रवाशी आणि रस्त्याच्या कडेला घरे असलेल्या नागरिकांना वाचा नेहमीच त्रास होतो.

कारवाईची अपेक्षा

अशा पद्धतीची उसवाहतूक ही प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. नियमांचे उल्लंघन करून उसाची वाहतूक करणाऱ्या चालकांवर आरटीओने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कारखाना प्रशासनाचेही

अशा वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून त्यांनीही यावर वचक ठेवावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे. मध्यंतरी कर्जत पोलिसांनी यावर मोठी ऍक्शन घेत ट्रॅक्टर चालकांना तंबी दिलेली होती. परंतु अशी कारवाई सातत्याने व सर्वत्र व्हावी अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News