Ahmednagar News : जिल्हा सहकारी बॅंकेने पतसंस्थांना कॅश‌ क्रेडिट सुविधा द्यावी, अहमदनगरमधील शिष्टमंडळ सहकार मंत्र्यांच्या भेटीला

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकणे फार गरजेचे आहे. आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिल्यास यामध्ये मोठा फरक पडू शकतो.

हीच मागणी घेऊन व यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व शिष्टमंडळाने सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन केली.

शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक सीताराम गायकर, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की आर्थिक गैरव्यवहार व अनियमित कारभारामुळे पारनेर तालुक्यातील दोन पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे पतसंस्था क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या पतसंस्थांना बसला आहे.

त्यामुळे तालुक्यात आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी सुस्थितीमधील पतसंस्थांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत कॅश क्रेडिट तसेच इतर आर्थिक सुविधा देण्याची परवानगी द्यावी, यासाठी सहकार विभागात धोरणात्मक काही बदल करावेत अशी मागणी करण्यात आली.

तालुक्यातील पतसंस्थाबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने काही समाजकंटकांसह काही राजकीय मंडळींकडून राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीला खत पाणी घातले. त्यामुळे सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सहकार बळकटीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा

सहकारी संस्था अधिक बळकटीकरण होण्याच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घ्यावे. या शिबिरासाठी मी स्वतः उपस्थित राहिल अशी सूचना सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी प्रशांत गायकवाड यांना केली. यावेळी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांची माहिती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी प्रशांत गायकवाड यांच्याकडून घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe