Cibil Score:- सिबिल स्कोर हा कर्ज घेताना बँका आणि वित्त संस्थांच्या माध्यमातून तपासला जातो. यामध्ये जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळणे कठीण होते आणि मिळाले तरी ते तुम्हाला जास्तीच्या व्याजदराने घेणे क्रमप्राप्त असते.
बऱ्याचदा आपण अगोदर घेतलेले कर्ज किंवा इतर काही गोष्टींमुळे सिबिल स्कोर घसरलेला असतो. त्यामुळे तुम्ही कालांतराने ते कर्ज भरले तर सिबिल स्कोर साधारणपणे किती दिवसांनी सुधारू शकतो किंवा त्यात वाढ होऊ शकते हे देखील यामध्ये महत्त्वाचे असते. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

ईएमआय चुकले तर सिबिल स्कोर घसरतो
समजा तुम्ही घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि सुरुवातीच्या कालावधीत तुम्ही त्याचे हप्ते वेळेवर भरत आलात. परंतु कालांतराने तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी आल्या किंवा तुमची आर्थिक स्थिती कमकुवत झाली तर तुम्हाला घेतलेल्या कर्जाचा हप्ता थांबवण्याशिवाय पर्याय उरत नाही.
त्यावेळी कर्जाचा हप्ता थांबल्यानंतर बँक तुम्हाला डिफॉल्ट श्रेणीमध्ये टाकते. त्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि तुम्ही राहिलेल्या हप्त्यांची रक्कम आणि त्यावर जमा झालेले व्याज बँकेला भरले. त्यानंतर आपल्याला वाटते की आता तुमचा घसरलेला सिबिल स्कोर वाढेल.
परंतु साधारणपणे घसरलेला सिबिल स्कोर कमीत कमी दोन वर्ष घसरलेल्या स्थितीतच राहतो. तुमच्या कर्जावरचे राहिलेले हप्ते तुम्ही भरले व त्यावरील व्याज देखील भरले तरी देखील कमीत कमी दोन वर्षापर्यंत सिबिल स्कोरमध्ये सुधारणा होत नाही.
घसरलेल्या सिबिल स्कोरची महत्वाचे नुकसान म्हणजे त्याची नकारात्मक रँकिंग ही प्रत्येक बँक व वित्त संस्थांपर्यंत पोहोचलेली असते. अशावेळी तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये कर्जासाठी गेला तरी तुमचा घसरलेला सिबिल स्कोर त्या ठिकाणी दिसून येतो व तुम्हाला कर्ज मिळत नाही.
घसरलेल्या सिबिल स्कोरमध्ये सुधारणा कशी करावी?
तुमचे व्यवहार आणि क्रेडिट कार्ड किंवा मोठ्या बिलांवरील पेमेंट पाहून क्रेडिट स्कोर सकारात्मक होतो. त्यामुळे बिल भरण्यामध्ये उशीर करू नये तसेच वेळेवर बिले भरावे आणि पूर्ण रक्कम भरणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण क्रेडिट कार्डचे फक्त किमान देय रक्कम भरतो.
परंतु असे न करता क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल भरावी व त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुधारतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक घेतलेले कर्ज परतफेड करतात परंतु बँकेकडून एनओसी घेत नाहीत. याचा देखील परिणाम सिबिल स्कोरवर विपरीत पद्धतीने होतो.
त्यामुळे तुमचे कर्ज परतफेड झाली असेल तर ताबडतोब बँकेकडून एनओसी घेणे गरजेचे आहे व त्यानंतरच तुमचा सिबिल वरील डेटा अपडेट होतो. हीच बाब क्रेडिट कार्डना देखील लागू होते. समजा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले तर बँकेकडे सर्व कागदपत्रे तुम्ही पूर्ण करावीत व क्रेडिट कार्ड बंद केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. या छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी केल्याने तुमच्या सिबिल स्कोरमध्ये सुधारणा होते.
तुमच्या सिबिल स्कोरची सॉफ्ट इंक्वायरी करणे
बऱ्याचदा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर स्वतः तपासता तेव्हा त्याला सॉफ्ट इंक्वायरी असे म्हटले जाते व यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड करता अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा सिबिल स्कोर तुम्ही
तपासून घ्यावा. परंतु या व्यतिरिक्त जर एखादी वित्त संस्था किंवा बँकेने तुमचा सिबिल स्कोर तपासला तर त्याला हार्ड इन्क्वायरी म्हणजेच कठोर चौकशी देखील म्हटले जाते. त्यामध्ये जर अनेक लेंडर्सनी तुमचा सिबिल स्कोर एकाच वेळी तपासला तर त्याचा देखील विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होतो व कालांतराने तुम्हाला कर्ज मिळणे मध्ये अडचणी निर्माण होतात.
या व्यतिरिक्त तुम्ही कमी कालावधीत अनेकदा कर्जासाठी अर्ज करणे टाळावे. कारण तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी लेंडर क्रेडिट ब्युरो कडून तुमचा क्रेडिट अहवाल मागवतात व त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर घसरू शकतो. त्यामुळे तुम्ही कुठेही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज कराल तर अगोदर तुम्ही तुमच्या क्रेडिट रिपोर्ट स्वतः तपासणी गरजेचे आहे.
त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोर बद्दल तुम्ही स्वतः जागरूक आणि अपडेट राहणे गरजेचे आहे. घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी बद्दल तुम्ही सावधगिरी बाळगावी आणि तुमचा सिबिल उत्तम राहील याकडे लक्ष केंद्रित करावी.