MSRTC Ayodhya Bus : राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची पहिली लालपरी आयोध्यासाठी महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. ही पहिली एसटी बस अयोध्येसाठी मार्गस्थ करण्याचा बहुमान धुळे विभागाने पटकावला आहे.
नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये विभाग नियंत्रक पदाची जबाबदारी सांभाळणारे धुळे विभाग नियंत्रक विजय गीते यांच्या संकल्पनेतून आयोध्या दर्शनाची ही संकल्पना साकारली आहे.
शनिवारी (दि.१०) भल्या पहाटे चार वाजता लाल परी धुळे येथून आयोध्येसाठी मार्गस्थ करण्यात आली. धुळे ते अयोध्या या अभिनव संकल्पनेस प्रवाशांनी व भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
धुळे विभागाला अयोध्यासाठी पहिली बस पाठवण्याचा बहुमान मिळाला. तीन मुक्काम करत जवळपास तीन हजार किलोमीटरचे अंतर धावल्यावर ही बस अयोध्ये येथे पोहोचणार आहे.
पहीला मुक्काम झाशी, दुसरा मुक्काम अयोध्या, तिसरा मुक्काम प्रयागराज असे प्रवासाचे टप्पे असणार आहेत. या प्रवासात एसटी बसचे दोन चालक तैनात राहणार आहेत. या आयोध्या वारीसाठी चार हजार ५४५ परतीसाठी प्रवास भाडे आहे.
दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात रामलाल यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून भारतभरातून रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ आयोध्याकडे लागली आहे.
महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक आयोध्या दर्शनासाठी इच्छुक आहेत. हे लक्षात घेऊनच मूळचे अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि राज्य परिवहन महामंडळात विभाग नियंत्रक पदाची जबाबदारी सांभाळणारे विजय गीते यांनी लाल परी च्या माध्यमातून आयोध्या वारीचे नियोजन केले.
त्यांच्या या संकल्पनेस मोठा प्रतिसाद मिळाला. फटाक्याच्या आतिषबाजीत धुळे येथून बस मार्गस्थ झाली. रवीवारी ही बस आयोध्या येथे पोहचणार आहे. आयोध्याकडे जात असताना रस्त्यात या बसची जागोजागी फुले उधळून पूजा करीत जंगी स्वागत करण्यात आले.