बिबट्याकडून वासरू फस्त नागरिकांमध्ये भितीचे वातावरण; पिंजरा लावण्याची मागणी

Sonali Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे बिबट्याकडून गायीच्या वासराची शिकार करण्याची घटना रविवार दि. ११ रोजी घडली.

घराशेजारील जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासराची शिकार करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर येथील शेतकरी महेश गोरख तवले यांच्या गायीच्या वासराची शिकार बिबट्याकडून करण्यात आली आहे.

भवानी माता मंदिर परिसरात गट नंबर १६५ मध्ये राहत असलेल्या महेश तवले यांच्याच कुत्र्याची शिकार मागील महिन्यात करण्यात आली होती.

या परिसरात बिबट्याचे कायमच दर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील भीती निर्माण झाली असून,

शेतीतील कामे करण्यासाठी मजूरही तयार होत नाहीत. वासराची शिकार झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने संजय सरोदे यांनी घटनेचा पंचनामा केला.

मृत वासराचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी प्रज्ञा कराळे यांनी केले. जेऊर परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आढळून येत आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांच्या देखील शिकार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तरी भवानी माता मंदिर परिसरामध्ये वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe