Ahmednagar News : पारनेर शहरातील मुख्य चौकात शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्या वर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा मास्टरमाईंड शोधा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे केली आहे.
गावठी कट्टा पुरवणारे परप्रांतीय मजूर असून पोलिसांनी तालुक्यामध्ये काॅम्बिंग आॅपरेशन राबवावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले आदींच्या सह्या आहेत.
पारनेर शहरात गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी १०.३० ते ११ सुमारास पारनेर नगरपंचायतचे महायुतीचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी अडकल्यामुळे फायर झालेच नाही. यामध्ये नगरसेवक पठारे बालंबाल बचावले आहेत.
हा प्रकार अतिशय निंदनीय असून संबंधित घटनेचा तीव्र निषेध करण्याकरिता तसेच तपास तातडीने करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याकरीता पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
हा राजकीय षडयंत्राचा भाग तर नाही ना? याचीही सखोल चौकशी करण्यात येऊन घटनेशी संबंधित असणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी.
पारनेर शहरातील घडलेल्या या घटनेचे व घटनेदरम्यान वापरण्यात आलेल्या शास्त्राचे गांभीर्य ओळखून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने संपूर्ण तालुकाभरात कोम्बिंग करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. संबंधित घटनेतील आरोपींना येत्या दोन दिवसात अटक न केल्यास पारनेर तालुक्यातील महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.