सुषमा अंधारे यांचा घणाघात ! म्हणाल्या श्रीराम एकवाचनी होते; मात्र भाजपने कुठलीच मर्यादा ठेवली नाही…

Published on -

Ahmednagar News : आधी हिंदू- मुस्लिम समाजात भांडणे लावली, आता मराठा व ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद लावला.

मुळात आरक्षण केंद्र सरकार आणि न्यायालयात होईल; मात्र हे सरकार तुम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेड्यात काढतंय.

सोबत लव्ह जिहादच्या नावाने हे दोन समाजात तेढ निर्माण करीत असताना मुस्लिम समाजाने दाखविलेल्या संयमाचे अभिनंदन करीत त्यांनी सामाजिक सलोखा जपला, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

मातृतीर्थ ते शिवतीर्थअंतर्गत अंधारे यांची कोल्हार येथे चौक सभा पार पडली. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे, संतोष जोर्वेकर, विजय गोहर, सागर बांगरे, योगेश कोरडे, रामदास गाढेकर, सोमनाथ गोरे व तालुक्यातील अनेक ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वाकचौरे म्हणाले, की गावापासून शहरापर्यंत केवळ राजकारणाची चर्चा आहे. राज्याचा विकास नव्हे तर केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. देशात उदंड राजकीय पक्ष झाले आहेत, ते देशासाठी घातक असून घटना व तिचा वापर विचार करायला लावणारा आहे.

अंधारे म्हणाल्या, पौष महिन्यात कुठलेही शुभ कार्य करत नसताना केवळ निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली. यांना हिंदू संस्कृतीच माहिती नसल्याने प्रभू श्रीराम यांना घरकूल योजनेचे लाभार्थी बनविले.

श्रीराम एकवाचनी होते; मात्र भाजपने कुठलीच मर्यादा ठेवली नाही. त्यामुळे हे कुठले हिंदूंचे अनुयायी? असा प्रश्न उपस्थित केला. शेतकरी जगला तर देश जगेल; परंतु यांनी शेतकऱ्यांवरच अन्याय केला. पोलीस फक्त मी कुठे चुकते, याची वाट पाहात आहेत.

राज्यात वाढलेली गुन्हेगारी, बेरोजगारीचा प्रश्न, यांसह आनंदाच्या शिधावर टीका करीत आम्ही एवढे दिवस उपाशी होतो का? असा निकृष्ट दर्जाचा शिधा दिला जात आहे. फुकट द्यायचं असेल, तर श्रीमंतांच्या मुलासारखे सर्वसामान्यांना शिक्षण द्या. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe