आगामी लोकसभेच्या अनुशंघाने अहमदनगर लोकसभेला महायुती तसेच महाविकास आघाडी यांचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. परंतु असे असले तरी भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे असतील व त्यांच्या विरोधात आ. निलेश लंके हे खासदारकीला उभे असतील असे गणित वर्षभरापासून रंगत आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क सध्या काढले जात आहे.
त्याअनुषंगाने दोघांमध्ये राजकीय द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळते. सध्या या दोघांचे राजकीय द्वंद्व अगदी शीतयुद्धापर्यंत येऊन ठेपल्याचे चित्र आहे. दोघेही एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

दरम्यान आता पारनेरमधील आजच्या (दि.20 फेब्रुवारी) एका कार्यक्रमात खा.सुजय विखे यांनी अगदीच शेलक्या शब्दात टीका केली आहे. प्रतिष्ठेची लढाई आता अगदी आता वैयक्तिक प्रतिमेवर येऊन ठेपली आहे.
काय म्हणाले खा. विखे पाटील
सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना खासदार कसा निवडायचा यांचा एक फॉम्युलाच सांगून टाकला. ते म्हणाले, ‘या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे फोटो तुमच्या मुला- मुलींसमोर ठेवायाचे आणि त्यांना विचारायचे की, तुम्हाला कोणासारखं व्हायचंय !
मुलांनी जर मी सोडून दुसऱ्या कोणाच्या फोटोला हात लावला तर खुशाला त्या उमेदवाराला मतदान करा असे थेट आव्हानच खा. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. आपण सुरशिक्षत, सुसंस्कृत उमेदवार असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांच्याकडून करण्यात आला असून दोघांमध्ये डॉक्टरेट वरूनही कलगितुरा रंगल्याचे पहायला मिळते.
डॉक्टर पदवीवरून कलगीतुरा !
लंके – विखे यांमध्ये डॉक्टर पदवीवरून देखील कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळते. या कार्यक्रमातही त्यांनी यावरून निशाणा साधला. खा.सुजय विखे म्हणाले, मी डॉक्टरची पदवी बोगस नाही तर ती अधिकृतपणे घेतलेली पदवी आहे.
मी जनतेला काय हवे आणि काय नको हे तपासूनच त्यावर उपचार करतो उगाचच चापलुसी करणार्यांपैकी मी नाही त्यामुळे लोकसभेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय तुम्हा मतदारांना घ्यायचाय असे विखे म्हणाले.
पारनेर तालुका पुरोगामी विचारांचा
खा. सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यातील मतदारांचे देखील कौतुक केले. ते म्हणाले, पारनेर तालुका पुरोगामी विचारांचा आहे पुरोगामी संस्कृतीचा आहे. तालुक्यातील महिलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने आम्ही जे काही पावले उचललेले आहेत त्याने महिलांची नक्कीच आर्थिक उन्नती होणार आहे.
जनतेने आता सगळा हिशेब करुन ठेवला असून मी कायम खासदार आहे, असा दावा मी कधीच करीत नाही व जे भावी म्हणून घेतात ते कधीच प्रत्यक्ष होत नाहीत हे देखील मतदारांनी लक्षात ठेवावे असे खा. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.