खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की,
आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.
यानुसार केंद्र सरकार स्वतः नाफेड आणि केंद्रीय सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट करणार आहे. याबाबत करार करून केंद्र सरकारने दुसऱ्या शेजारील देशाला कांदा निर्यात कण्याची जबाबदारी घेतली आहे.
त्यामुळे ३१ मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो तसाच आहे, मात्र कांदा हा निर्यात होणार याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी सांगितले की, काही माध्यमांद्वारे पूर्णतः गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टला मंत्री समितीकडून मान्यता मिळाली आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी.
केंद्र सरकारद्वारे शेजारच्या देशांनी केलेल्या मागणीनुसार कांदा निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्या देशामध्येच उचित भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.