Ahmednagar Breaking : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत द्विधा अवस्था निर्माण असून कांदा निर्यात बंदी धोरणाबाबतीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात मातीफेक केली असल्याचा आरोप करत पारनेर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी बुधवारी निषेध आंदोलन केले. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत सुरु ठेवलेल्या कांदा निर्यातीविरोधात पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केले.
केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठविण्या बाबत निर्णय घेतल्याचे प्रसिध्दी माध्यमांमधून सांगण्यात आले. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे कांदा उत्पादकांना भाव वाढीची अपेक्षा लागली होती.
पण शासनाने या बाबत कोणतीही अधिकृत शासन निर्णय अथवा नोटीफिकेशन काढले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थोडीफार भावात सुधारणा झाली होती. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय न होता ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यात बंदी कायम ठेवण्यात आल्याची सांगण्यात आले.
त्यामुळे कांदा उत्पादक, व्यापारी यांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसून कांदा उत्पादकांचे आशेवर पाणी फिरले गेले. त्यामुळे लगेचच कांदयाचे भाव बाजार समित्यांमध्ये गडगडल्याचे दिसून आले.
याचा निषेध करण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी व्यापारी वर्गानेही शेतकऱ्यांना पाठींबा दिला.
कांदा निर्यात बंदी उठवण्याचा कांगावा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ही बंदी उठली नसल्याने केंद्र सरकार शेतकऱ्यांशी भावनांशी खेळत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे यांनी केला.
केंद्र शासनाची भूमिका नेहमी शेतकरी विरोधी असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. सध्या विविध ठिकाणी शेतकरी संतप्त भावना व्यक्त करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात येत आहे.