सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक एक्सप्रेसवेची कामे हाती घेण्यात आलेली असून काही एक्सप्रेस वेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. होऊ घातलेल्या या विविध ठिकाणाच्या एक्सप्रेस वे मुळे देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहेच
परंतु औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील येणाऱ्या काळामध्ये ही एक्सप्रेस वे खूप महत्त्वाची ठरणार आहेत. जर आपण सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास जलद झाला व एवढेच नाही तर यामुळे औद्योगिक आणि कृषी विकासाला देखील गती मिळणार आहे.
याव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कालावधीत काही एक्सप्रेस वे नियोजित असून लवकरच त्यांच्या देखील कामाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाचा विचार केला तर हा देखील महामार्ग खूप महत्त्वाचा असून त्याच्या अंतिम आखणीला राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.
नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग जोडणार 19 देवस्थानांना
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आखणीला राज्य सरकारच्या माध्यमातून अंतिम मान्यता देण्यात आलेली असून हा एकूण 802 किलोमीटर लांबीचा द्रूतगती महामार्ग असून जवळजवळ हा राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे व या बारा जिल्ह्यातील एकोणावीस देवस्थानांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या महामार्गाच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या महामार्गाचा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अंतिम केला जाणारा असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शक्तीपीठ या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गाची उभारणी करणार आहे. या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून होईल व गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणी संपेल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नागपूर-गोवा म्हणजे शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर आणि गोवा या दोन्ही दरम्यानचा प्रवास 11 तासात पूर्ण होणे शक्य होणार आहे.
सध्या जर आपण पाहिले तर या प्रवासासाठी 21 तासांचा कालावधी लागतो. म्हणजेच शक्तीपीठ महामार्गामुळे तब्बल दहा तासांनी हा प्रवास कमी होणार आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून जाणार हा महामार्ग?
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणार आहे व या महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर असून या अंतरात एकूण 26 ठिकाणी इंटरचेंजेस असणार आहेत.
शक्तीपीठ महामार्गामुळे जोडली जाणार ही देवस्थाने
1- वर्धा जिल्ह्यातील देवस्थान– केळझर चा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर आणि सेवाग्राम
2- वाशिम जिल्ह्यातील देवस्थान– पोहरादेवी
3- नांदेड जिल्ह्यातील देवस्थान– माहूरगड शक्तीपीठ आणि सचखंड गुरुद्वारा
4- हिंगोली जिल्ह्यातील देवस्थान– औंढा नागनाथ ( ज्योतिर्लिंग )
5- बीड जिल्ह्यातील देवस्थान– परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ
6- धाराशिव जिल्ह्यातील देवस्थान– तुळजापूर
7- सोलापूर जिल्ह्यातील देवस्थाने– पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच अक्कलकोट
8- सांगली जिल्ह्यातील देवस्थान– औदुंबरचे दत्त मंदिर
9- कोल्हापूर जिल्ह्यातील देवस्थाने– नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर आणि संत बाळूमामा समाधी स्थळ आदमापूर
10- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थाने– कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी