देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन व वाहतूक कामी इलेक्ट्रिक घंटागाडीचे वाटप तसेच उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना कर्ज व लाभ वाटप आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समर्थ शेवाळे, राहुल शेळके, उमेदचे सोमनाथ जगताप, महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्जे तसेच महिला व नागारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार विखे म्हणाले, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे चांगले व्यवस्थापन देखील केले पाहिजे. यासाठी अहमदनगर महापालिकेच्या परिसरातील व नगर तालुक्यातील गावांना घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती खासदार विखेंनी दिली.
तसेच मागील ज्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या आपण वाटप केल्या होत्या, त्या नगर एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. नगरमधील युवकांना रोजगार मिळावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता आणि त्या इलेक्ट्रिक घंटा गाड्या त्यांनी केवळ तीन लाख रुपयांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी ज्या गाड्या दिल्या जात आहेत त्या पाच लाख रुपये किमतीच्या असून उत्तम दर्जाच्या गाड्या या ग्रामपंचायतींना आज आपण प्रदान केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने या घंटागाडीचा कचरा गोळा करण्यासाठी वापर करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन यावेळी सुजय विखे पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या अनुषंगाने या एका वर्षामध्ये महिला बचत गटांमध्ये सुमारे 185 कोटी रुपयांचे जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा नियोजनामध्ये महिला रोजगार निर्मिती करण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तेव्हापासून अशा विविध हितावह धोरणांचा अवलंब करून महिला सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. जोपर्यंत महायुती सरकार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री असतील तोपर्यंत महिलांना व महिला बचत गटांना कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी आश्वासित केले.
तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी 27 आणि 28 तारखेला नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महा रोजगार मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केले.
हे पण वाचा : ब्रेकिंग ! हवामानात मोठा बदल, अहमदनगर पुणेसह महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पावसाची शक्यता