Ahmednagar Breaking : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठे वृत्त आले आहे. आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीत महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
याच पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समजली आहे. केलेल्या आरोपाचे पुरावे न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असा इशाराच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयी माहिती दिली.

महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही काहीही बेताल वक्तव्य कराल मात्र जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा त्याचप्रमाणे तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही असेही विखे पाटील यांनी यावेळी सुनावले.
ते पुढे म्हणाले, पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवानं परंपरा पुढे नेण्याचे ठरवले दिसते असे म्हणत त्यांनी शरद पवारांनाही चिमटा काढला. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली असून केलेल्या वक्तव्याचे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असा इशाराच राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांवरही टीकास्त्र
मनोज जरांगे पाटील यांवरही टीकास्त्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले. विखे म्हणाले की, मनोज जरांगे यांना समाजाने आदराच स्थान दिलं होतं परंतु त्यांनी आता मी म्हणजे मराठा समाज हे डोक्यातून काढून टाकून मराठा समाजाच्या भावनेशी खेळणं बंद करावे असे म्हटले आहे. फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे कोणत्याही शीष्टाचारला धरून नसल्याचे विखे यांनी म्हटले आहे.