15th Finance Commission : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाच वर्षात कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. परंतु आता हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना विविध विकासकामांसाठी राज्य शासन तर निधी देतच असते याशिवाय केंद्र शासनाकडून देखील वित्त आयोगाचा निधी मिळत असतो. या निधीचे बंधित व अबंधित असे दोन हप्ते दरवर्षी प्राप्त होत आलेले आहेत.

या निधीपैकी ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी मिळतो तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के निधी प्राप्त होत असतो. या वित्त आयोगाच्या अखेरच्या वर्षातील ९४ कोटी ६५ लाखांचा पहिला हप्ता नुकताच ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतचे अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
पंधराव्या वित्त आयोगाचा किती मिळाला निधी
अहमदनगर जिल्ह्यात १,३२० ग्रामपंचायती असून सण २०२३-२४ या वर्षात बंधित निधी म्हणून ५६ कोटी ७९ लाख १४ हजार तर अबंधित निधी म्हणून ३७ कोटी ८६ लाख ११ हजार निधी मिळाला आहे.
शासनाकडून मिळालेला निधी कशावर करायचा असतो खर्च?
१५ व्या वित्त आयोगाचा निधी हा दोन प्रकारचा असून यात अनटाईड (अबंधित) व टाईड (बंधित) असे दोन प्रकार येतात. यामधील जो अनटाईड निधी आहे तो गावातील विकासकामांच्या गरजेनुसार वापरला जातो व टाईड निधीचा विचार करता हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या फक्त ठरावीक कामांसाठीच खर्च केला जातो.
मागील साडेचार वर्षात टाईड-अनटाईडचे प्रत्येकी 9 हप्ते ग्रामपंचायतींना मिळालेले असून अखेरचा हप्ता मार्चअखेर येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.