Ahmednagar News : तलवारीने केक कापून तसा स्टेटस मोबाईलला ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप नवनाथ माळी (रा.मळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संदीप नवनाथ माळी याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापला असून त्याबाबतचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता. तो व्हीडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत निर्मा करत असल्याची माहिती दिली.
त्यानुसार पोलिस निरीक्षक भदाणे यांच्या आदेशावरून पोहेकाँ. नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि. शाम गुजाळ, पोशि. बप्पासाहेब धाकतोडे, पोशि. संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ. राहुल गुडू, नितीन शिंदे यांच्या तांत्रिक व लोकेशन मदतीनेमाळी याचा शोध घेतला असता तो बोधेगाव या ठिकाणी मिळून आला.
त्याला ताब्यात घेउन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढऱ्या रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. सदर तलवारीसह माळी याला ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकाने केली.