Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते; परंतु याबाबत ई-पशुधन अॅपमध्ये अनेक जाचक अटी असल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित होते. याबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असणाऱ्या अनेक जाचक अटी मागे घेण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे.
यावेळी कर्डिले म्हणाले, की मंत्री विखे पाटील, खासदार डॉ. विखे पाटील व आम्ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. महायुतीची सत्ता आल्यापासून मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवले आहेत, असे ते म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, माजी संचालक उत्तमराव म्हसे, सुरसिंग पवार,
रवींद्र म्हसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, राहुरी शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, अर्जुन पानसंबळ, शिवाजी सागर, भीमराज हारदे, शरदराव पेरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. विखेंची खंत
नगर-मनमाड रोडचे काम, कांदा निर्यातबंदी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान अशी अनेक विकास कामे आपण मार्गी लावली. मात्र हे सर्व प्रश्न मार्गी लागले याबाबत कोणीही सत्कार केला नाही, आभार मानले नाही, अशी खंत खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.