अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस रस्त्याने जात असलेल्या सहा बैल गाडी ऊस वाहतूकीपैकी शेवटी असलेल्या गणेश कारखान्याच्या बैल गाडीला पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिल्याने बैल गाडीतील तीन ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले, तर एक बैल जागीच ठार झाला आहे.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या राहाता गटातील सहा बैलगाड्या पहाटेच्या वेळेस कारखाना स्थळावरुन राहाता येथे ऊसतोड करण्यासाठी चाललेल्या असताना राहाता चितळी रोडवरील एकरूखे गावात कुरेशी याच्या वस्तीनजीक मागून आलेल्या अज्ञात डंपरचालकाने जोराची धडक दिली.

यामध्ये सविता सुरेश राठोड (वय ३५), संतोष गबरु राठोड (वय ३३) व राहुल शिवाजी राठोड (राहाणार चाळीसगाव, हल्ली मुक्काम गणेशनगर साखर कारखाना) हे ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. डंपरचालक पसार झाला आहे.

घटनेनंतर अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिकेतुन शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत संतोष गबरु राठोड यांनी फिर्याद दाखल केली असून आज्ञात डंपर चालकाविरोधात राहाता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बैलजोडी आपण सव्वा लाख रुपयाला नुकतीच खरेदी केलेली होती, असे राठोड यानी सांगितले. गणेश कारखान्यात ऊसतोड मजूर व ऊस वाहतुकीसाठी बैलजोडी याचा विमा संरक्षण उतरविण्यात आला असून या घटनेत मृत बैलाची भरपाई व हॉस्पिटल खर्च कारखाना करणार असल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe